नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नाणार प्रकल्पाला असलेला स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध, सर्व ग्रामपंचायतींचे विरोधाचे ठराव, जमीन मोजणींसह ठप्प झालेली भूसंपादन प्रक्रिया, संमतीखेरीज भूसंपादन न करण्याचे शासनाचे धोरण, उग्र होत चाललेले आंदोलन आणि जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प न लादण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावही सादर करण्याची सूचना उद्योग सचिवांना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग विभागाच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

तुतीकोरीन येथील स्टरलाईट उद्योगाच्या विरोधातील आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत तेरा स्थानिक लोक ठार झाले. येथील जनतेला तीव्र विरोध आणि उडालेला आंदोलनाचा भडका यामुळे तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना प्रकल्प बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा लागला. नाणार प्रकल्पाबद्दलही स्थानिक लोकांच्या मनात तीव्र असंतोष असून पुढे आंदोलनाचा मोठा भडका उडू शकतो. हे लक्षात घेऊन आणि तुतीकोरीनसारखी दुर्दैवी परिस्थिती नाणारमध्ये उद्भवू नये यासाठी वेळीच उपाययोजना करावी अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. शिवसेना-भाजप युतीच्या लोकाभिमुख शासनाच्या कार्यकाळात अशी काळी घटना घडता कामा नये या जनहितार्थ भावनेतून शिवसेनेचे सर्व मंत्री नाणार प्रकल्पासाठी प्रसिद्ध झालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यासाठी आपल्याकडे आलेल्या उद्योग विभागाच्या प्रस्तावाला आपण तत्काळ मंजुरी द्यावी अशी विनंतीवजा मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.