नोव्हाक जोकोविचचा ‘ग्रॅण्डस्लॅम’मध्ये नवा विक्रम

सर्बियाचा २४ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान ग्रॅण्डस्लॅ म स्पर्धांमध्ये नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तिसऱ्या फेरीत जोकोविचने बोटिक व्हॅन डे झेंण्डशुल्पचा ६-३, ६-४, ७-६ असा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. ही जोकोविचची ग्रॅण्डस्लॅम एकेरीतील ४०० वी विजयाची नोंद असून, हा टप्पा गाठणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

फेडररच्या विक्रमाचीही केली बरोबरी

वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचचा हा १०२वा विजय आहे. या यशासह या स्पर्धेत त्याचा विजय-पराभवाचा विक्रम १०२-१० असा झाला असून, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत त्याने रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील विक्रमाशी बरोबरी साधली आहे. जोकोविचने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद १० वेळा पटकावले असून, हा विक्रम कोणत्याही खेळाडूकडे नाही. ३८ वर्षीय जोकोविच यंदा आपल्या कारकिर्दीतील २५वे ग्रॅण्डस्लॅ म विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने उतरला आहे. हे यश मिळाल्यास तो सर्वकालीन सर्वात यशस्वी टेनिसपटू ठरेल.