
सर्बियन स्टार आणि ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या पंचविशीच्या उंबरठ्यावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत आपल्या विजयाची शंभरी साजरी केली. त्याने ब्रिटनच्या कॅमरन नॉरीचा धुव्वा उडवून या स्पर्धेत विजयाचे शतक झळकाविले. फ्रेंच ओपमनध्ये (112) सर्वप्रथम विजयाची शंभरी ओलांडण्याचा मान स्पेनच्या राफेल नदालला मिळाला आहे.
जोकोविचने कॅमरन नॉरीचा 6-2, 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पाडाव करीत सलग 16 व्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता त्याची गाठ जर्मनीच्या तृतीय मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेव याच्याशी पडेल. टॅलन ग्रिकस्पूर जायबंदी झाल्याने झ्वेरेवने आगेकूच केली. जोकोविचच्या खात्यात 24 ग्रॅण्डस्लॅम पदके असून त्यात तीन ग्रॅण्डस्लॅम ही फ्रेंच ओपनची आहेत. विजयाचा धडाका लावलेल्या जोकोविचसमोर ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांचे रौप्य महोत्सव हे एकमेवच लक्ष्य उरले आहे.
सबालेंका, स्वीटेकची आगेकूच
महिला एकेरीत अव्वल मानांकित इरिना सबालेंकाने आठव्या मानांकित चीनच्या क्विनवेन झेंगचा 7-6(7/3), 6-3 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. ही लढत एक तास 57 मिनिटांपर्यंत रंगली. याचबरोबर पाचव्या मानांकित पोलंडच्या इगा स्वीटेकने दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत 13 व्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा 6-1, 7-5 असा पराभव केला. ही लढत एक तास 41 मिनिटांपर्यंत चालली.
एका ग्रॅण्डस्लॅममध्ये विजयांचे शतक
रॉजर फेडरर – ऑस्ट्रेलियन ओपन (102), विम्बल्डन (105)
राफाएल नदाल – फ्रेंच ओपन (112)
नोव्हाक जोकोविच – फ्रेंच ओपन (100)
मार्टिना नवरातिलोव्हा – विम्बल्डन (120), ख्रिस एव्हर्ट- अमेरिकन ओपन (101)
सेरेना विल्यम्स – अमेरिकन ओपन (108)