नोवाक जोकोवीचकडे जर्मनीच्या स्टेफी ग्राफची बरोबरी करण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोवीचकडे या वर्षी इतिहास रचण्याची संधी असणार आहे. एकाच वर्षी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन व अमेरिकन या चारही ग्रॅण्डस्लॅमच्या जेते पदासह ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावण्याची संधी या पठ्ठय़ाकडे असणार आहे. अशी ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करण्याची ऐतिहासिक कामगिरी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये फक्त स्टेफी ग्राफ या जर्मनीच्या माजी महान टेनिसपटूने महिला गटात केलेली आहे. पुरुषांच्या गटात एकाही टेनिसपटूला अशी करामत करता आलेली नाही. नोवाक जोकोवीच याने या वर्षी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच व विम्बल्डन या तीन ग्रॅण्डस्लॅमच्या जेते पदावर मोहोर उमटवली असून आता त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील आपला सहभागही निश्चित केलेला आहे. नोवाक जोकोवीचचे लक्ष्य आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल व अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅमचे जेत पद हेच असणार आहे. कारण त्यानंतरच त्याला नवा इतिहास रचता येणार आहे.

सर्बियासाठी लढणार

कोरोना व फिटनेसच्या पार्श्वभूमीवर रॉजर फेडरर, रफाएल नदाल, स्टॅन वावरिंका, सेरेना विल्यम्स, सिमोना हालेप या स्टार खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतलीय. नोवाक जोकोविचचेही या क्रीडा महोत्सवात खेळणे संदिग्ध होते. अखेर त्याने शुक्रवारी यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या वेळी तो म्हणाला, ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवामध्ये सर्बिया या आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे याचा मला अभिमान आहे. देशासाठी खेळताना नेहमीच प्रेरणा मिळते. आता मी पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन आणि देशवासीयांच्या चेहऱयावर आनंद आणीन, असेही भावुक उद्गार त्याने या वेळी काढले.

1988 सालचा करिष्मा

स्टेफी ग्राफ हिने 1988 साली चार ग्रॅण्डस्लॅम जेते पदासह ऑलिम्पिक गोल्ड मेडलही जिंकले होते. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये अद्याप तिच्या व्यतिरिक्त एकाही टेनिसपटूला असा करिष्मा करता आलेला नाही. स्टेफी ग्राफने 1988 साली ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये ख्रिस इव्हर्टला 6-1, 7-6 असे सहज हरवत वर्षातील पहिले ग्रॅण्डस्लॅम पटकावले. या संपूर्ण स्पर्धेत ती फक्त 29 गेममध्ये पराभूत झाली. या दरम्यान एकही सेट न पराभूत होता तिने जेते पद पटकावले हे विशेष. त्यानंतर फेंच ओपनमध्ये तिने नताशा झ्वेरेवा हिला 6-0, 6-0 अशा फरकाने अवघ्या 34 मिनिटांमध्ये लोळवले. ही विक्रमी वेळ ठरली. स्टेफी ग्राफने विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅममध्ये मार्टिना नवरातिलोवा हिला 5-7, 0-2 अशा फरकाने पिछाडीवर असतानाही 5-7, 6-2, 6-1 अशा फरकाने हरवत वर्षातील तिसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकले. अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅममध्ये स्टेफी ग्राफने सबातीनीला 6-3, 3-6, 6-1 असे तीन सेटमध्ये नमवले व ‘क@लेण्डर ग्रॅण्डस्लॅम’ पूर्ण केले. सिऊलमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये स्टेफी ग्राफने पुन्हा एकदा सबातीनीवर 6-3, 6-3 असा विजय मिळवत ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण केले.