हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकारणार, विजयादशमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली पोलिसांना ‘गुड न्यूज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणताही सणवार, कोरोना काळ, ऊन-पाऊस-वादळ कशाचीही तमा न बाळगता कायदा व सुव्यवस्था राखणाऱया पोलीस हवालदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीनिमित्त ‘गुड न्यूज’ दिली आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येत नव्हते. त्यामुळे पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीच्या संदर्भातील प्रस्तावाला आज मान्यता देण्यात आली. या क्रांतिकारी निर्णयामुळे सेवानिवृत्तीपूर्वी पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न साकार होणार आहे.

दसऱयाच्या सणाला दिवाळी साजरी

या निर्णयामुळे अंमलदाराला अधिकारी पदावरून निवृत्त होता येईल. पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत 45 हजार हवालदार, पोलीस सहाय्यक, पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांना होईल. विजयादशमीच्या मुहूर्तावरच्या या निर्णयामुळे हजारो अंमलदारांच्या घरात अक्षरशः दिवाळी साजरी होणार आहे.

बढतीची दीर्घ प्रतीक्षा संपली

पोलीस शिपाई आता पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होतील. पोलीस शिपायांना सर्वसाधारण 12 ते 15 वर्षांनंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होते. त्यांच्या कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. पोलीस अंमलदारांना पदोन्नतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर दहा वर्षांच्या सेवेनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे, पण वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधी लागतो.

पोलिसांचे आत्मबल वाढवण्यासाठी

पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढवून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदावरून सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर तीन वर्षे सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.

तब्बल 66 कोटी दिवस

पोलीस दलात सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजासाठी मिळणाऱया सुमारे 23 कोटी इतक्या मानवी दिवसामध्ये सुमारे 66 कोटी दिवस इतकी वाढ होईल. त्यातून गुन्हे उघडकीस येण्याबरोबर व गुह्यांना आळा घालण्यास मदत होईल.

या प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. मुख्य सचिव सीताराम पुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही व शासन निर्णयही जारी करण्याचे आदेश देत हा प्रस्ताव मंजूर केला.

दसऱयानिमित्त नायगाव येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयातील आरमोरीमध्ये पारंपरिक पद्धतीने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त निकेत काwशिक, राजकुमार व्हटकर, अपर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.