आता ईडीच्या रडारवर अल फलाह विद्यापीठ, आर्थिक व्यवहारांची होणार तपासणी

फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ आता ईडीच्या रडारवर आले आहे. ईडी आता विद्यापीठाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद ट्रान्झॅक्शनची सखोल चौकशी करणार आहे. त्याचबरोबर इतर तपास यंत्रणाही दहशतवादी निधीपुरवठा आणि पैशांचे झालेले व्यवहार शोधण्याचे काम करत आहेत. विद्यापीठाच्या खात्यांची आणि संबंधित संस्थांची तपासणी केल्यास दहशतवादी मॉड्यूलच्या निधीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिल्ली स्फोट प्रकरणाची तपासणी NIA आधीपासून करत आहे, आणि आता ईडी आणि आर्थिक अन्वेषन विभागही या चौकशीत सहभागी झाले आहेत.

फरीदाबाद टेरर मॉड्यूल प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात हरयाणा पोलिसही अल-फलाह विद्यापीठाच्या मुख्यालयात पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर शाहीन सईद आणि डॉक्टर उमर हे सर्वजण या विद्यापीठाशी संबंधित आहेत. पोलिसांनी विद्यापीठाकडून या तिघांविषयी तपशीलवार माहिती आणि संबंधित कागदपत्रे मागवली आहेत, जेणेकरून तपासात नवे पुरावे मिळू शकतील.

ज्या लाल रंगाच्या ब्रेजा कारचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत होत्या, ती अखेर सापडली आहे. माहितीप्रमाणे, ही कार फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या परिसरातून जप्त करण्यात आली आहे. ही तीच ब्रेजा कार आहे जी फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते आणि ज्यामध्ये स्फोटक साहित्य असल्याची शंका व्यक्त केली जात होती. सध्या फॉरेन्सिक टीम या कारची बारकाईने तपासणी करत आहे. सूत्रांच्या मते, ही लाल ब्रेजा डॉ. शाहीन यांच्या नावावर रजिस्टर आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोमवार (10 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सुमारे 6:52 वाजता अचानक एका i20 कारमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे परिसरात भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता. प्राथमिक तपासात उघड झाले की या स्फोटात अमोनियम नायट्रेटसह अनेक ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात आला होता. स्फोटानंतर दिल्ली पोलिस आणि एनएसजीच्या टीम्स तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि संपूर्ण परिसर सील करून तपास मोहीम सुरू केली.

स्फोटात वापरलेली कार डॉ. उमर नबी यांच्या नावावर रजिस्टर होती असे तपासात आढळले आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांनी फरीदाबादहून डॉ. उमर नबी, डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 2,900 किलो स्फोटक, शस्त्रे आणि कोडेड डायरी जप्त करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांच्या मते, हे एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहे, जे जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात सक्रिय होते आणि याचा संबंध पाकिस्तान समर्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.