
साठ वर्षांपूर्वी मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून मराठी माणूस इरेला पेटला होता. प्रचंड मोठय़ा संघर्षानंतर, शेकडोंच्या बलिदानानंतर त्याने मुंबई मिळवली. आज तीच मुंबई पुन्हा महाराष्ट्रापासून तोडण्याचे भयंकर षड्यंत्र रचले गेल्याची जाणीव पुन्हा एकदा मराठी माणसाला झाली आहे. महानगरपालिका मराठी माणसांसाठी लढणाऱयांच्या हाती राहिली तरच मुंबई वाचू शकणार आहे. याच भावनेतून मराठी माणूस पेटून उठला आहे. उद्याची निवडणूक हा एक निर्णायक लढा आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी आन त्याने घेतली आहे. मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी सज्ज व्हा, असे कळकळीचे आवाहनही त्याने तमाम मुंबईकर आणि मराठीप्रेमींना केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. ही निवडणूक केवळ राजकीय पक्षांचेच नव्हे, तर मुंबई आणि मराठी माणसाचेही भवितव्य ठरवणारी ऐतिहासिक निवडणूक आहे. मुंबईवर जीव ओवाळून टाकणाऱयांच्या हाती मुंबई द्यायची, की मुंबईचा घास घ्यायला टपलेल्यांच्या पदरात टाकायची याचा फैसला उद्या मराठी माणसाच्या आणि मुंबईकरांच्या हातात आहे. मुंबई आपली आहे आणि आपल्याच ताब्यात राहिली पाहिजे अशी शपथ घेऊनच उद्या मतदानाला उतरणार, अशा भावना मुंबईकर मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. महापालिका निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएम मशीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.
बहुसदस्यीय पद्धत
मुंबई वगळता अन्य 28 महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. मुंबई महापालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणतः चार जागा असतील. काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार या 28 महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला किमान 3 ते 5 मते देणे बंधनकारक असेल.
गुलाबी मतदान केंद्र
महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी महिला असतील आणि असे मतदान केंद्र ‘गुलाबी मतदान केंद्र’ (पिंक)म्हणून ओळखले जाईल.
मतदार आणि मतदान केंद्रे
पुरुष ः 1 कोटी 81 लाख 93 हजार 666, महिला ः 1 कोटी 66 लाख 79 हजार 755, इतर ः 4 हजार 596, एकूण मतदार ः 3 कोटी 48 लाख 78 हजार 17, मतदानाची वेळ ः सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत, एकूण मतदान केंद्रे ः 39 हजार 92
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी प्राधान्य
मागच्या निवडणुकीतील गैरव्यवस्थेमुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. त्यावरून निवडणूक आयोगावर सर्वांनीच जोरदार टीका केली होती. त्यातून आयोगाने धडा घेत यावेळी चोख व्यवस्था ठेवल्याचा दावा केला आहे. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, ताह्या बाळासह असणाऱया स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरूपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पुरती सुविधा उभारली असून व्हीलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध असेल.
- राज्यात 3 हजार 916 केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यातील सर्वाधिक 997 केंद्रे पुण्यात आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगरात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.
29 महापालिकांसाठी होणार मतदान… उद्या मतमोजणी, 15 हजार 931 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरातील 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार 39 हजार मतदान केंद्रांमध्ये एका बोटाने 15 हजार 931 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करणार आहेत. त्यात मुंबईतील 1700 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत मतचोरी आणि बोगस मतदान होऊ नये यासाठी विरोधी पक्षांचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून आहेत. सत्ताधारी महायुतीला हेराफेरीची संधी मिळू नये म्हणून मतदान केंद्रांबाहेरही कार्यकर्त्यांचा जागता पहारा आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह काँग्रेस कार्यकर्ते मतदान केंद्र आणि परिसरातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.





























































