
सरकारी सेवेतील भरती बाह्यस्रोतांद्वारे (आऊटसार्सिंग) करण्यास शासकीय कर्मचारी संघटनेचा विरोध आहे. पण हा सर्व विरोध डावलून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत 1 हजार 971 शिक्षकांची आऊटसार्सिंगद्वारे भरती करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.
सरकारी सेवेत सुमारे पावणेदोन लाख विविध पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने किंवा बाह्य स्रोतांद्वारे भरती करण्यास कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. कायमस्वरूपी कर्मचारी नेमल्यास संबंधित कर्मचारी जबाबदारीने काम करतात. पण कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी काही दिवसांसाठीच कामावर असतात. त्यामुळे बाह्य स्रोतांद्वारे कर्मचारी भरती करू नका, अशी अनेक पत्र कर्मचारी संघटनांनी सरकारला वारंवार दिलेली आहेत. पण तरीही आदिवासी विभागातील आश्रम शाळेत उच्च माध्यमिक, माध्यमिक, पदवीधर माध्यमिक शिक्षक तसेच मराठी व इंग्रजीचे प्राथमिक शिक्षक असे एकूण 1 हजार 791 शिक्षक बाह्य स्रोतांद्वारे भरण्यास आदिवासी विकास विभागाने मान्यता दिलेली आहे.