
सामना प्रतिनिधी । मुंबई
पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱया पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई आता मिनी रोबोद्वार केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ मॅनहोलच्या आजूबाजूनेच पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई केली जात होती. मात्र यापुढे एका टोकापासून ते दुसऱया टोकापर्यंत वाहिन्यांची संपूर्ण अंतर्गत सफाई करता येणार आहे. त्यामुळे आतील विषारी वायूशी कामगारांचा संपर्क येणार नाही. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकणार आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शहर भागात ब्रिटिशकालीन 34 कि.मी. लांबीच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या आहेत. या वाहिन्यांमध्ये कचरा साठल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकत नाही, परंतु या वाहिन्यांचा आकार लहान असल्यामुळे त्यांची सफाई करणे अवघड असते. अरुंद, चिंचोळय़ा पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता लक्षात घेऊन आजवर या वाहिन्यांच्या ‘मॅनहोल’ मध्ये ‘सक्शन पाइप’ टाकून शक्य ती साफसफाई केली जात असे. मात्र या वर्षीपासून या वाहिन्यांच्या आत जाऊन साफसफाई करू शकेल असे अत्याधुनिक स्वरूपाचे व रिमोट कंट्रोलच्या मदतीने नियंत्रित करता येईल असे ‘मिनी रोबो’ हे यंत्र उपयोगात आणले जाणार आहे, अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता श्रीकांत कावळे यांनी दिली आहे.
असा आहे मिनी रोबो
रिमोट कंट्रोलद्वार ‘मिनी रोबो’ हे यंत्र नियंत्रित केले जाते. हे ‘मशीन’ वॉटरप्रूफ असून 280 अश्वशक्तीच्या वाहनावरील पंपास हे यंत्र जोडलेले असल्याने ते तेवढय़ा ताकदीने गाळ खेचू शकेल. या यंत्रावर असणाऱया ‘सीसीटीव्ही कॅमेऱया’मुळे यंत्र कुठे वळवायचे व त्याचा वापर कसा करावयाचा हे ठरवता येऊ शकेल. वाहिन्यांमध्ये अत्यंत कठीण-कडक झालेला (Hard) गाळ असल्यास व तो पाण्याच्या फवाऱयानेही काढला जाणार आहे. त्यानेही निघत नसल्यास अशा गाळाचे तुकडे करून तो गाळ काढता यावा यासाठी या यंत्राला ‘ड्रिल मशीन’ जोडलेले आहे.





























































