अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा थंडा…थंडा..कूल…कूल शोध; आता वापरा ‘कूल पीपीई किट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी पीपीई किट, मास्क, सॅनीटायझर या वस्तूंचा वापर दररोज केला जात आहे.  कोरोनाच्या संकटकाळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वांनाच आवश्यक असलेले पीपीई किट  वापरताना अडचणींचा सामंना करावा लागतो. हे किट घातल्यावर गर्मीमुळे शरारातून घामाच्या धारा निघतात. मात्र, पीपीई किट काढता येत नसल्याने त्याच वातावरणात त्यांना काम करावे लागते. त्यावर एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे.

या विद्यार्थ्याने बनवलेले पीपीई किट ‘कूल’ असणार आहे. हे वापरणाऱ्यांना आता गर्मीचा त्रास सहन करावा लागणार नाही. पुण्यातील एका अभियांत्रिकी शाखेच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने अशा अनोख्या पीपीई किटचा शोध लावला आहे. कोरोना संसर्गापासून वाचण्याकरिता पीपीई किट वापरणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत पुण्यात राहणारा निहाल सिंह आदर्श याने हे ‘कूल पीपीई किट’ तयार केले आहे.

हे पीपीई किट घातल्यानंतर त्यातील डिवाइसमुळे शरीराला गारवा मिळतो. त्यामुळे कोरोना योद्धे, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, रुग्ण असे जे सध्याच्या काळात कोरोनाशी लढत आहेत, ते कोणीही हे अऩोखे पीपीई किट वापरू शकतात, असे त्याचे म्हणणे आहे.

मे 2020 मध्ये मुंबईतील के.जे. सोमेय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात या पीपीई किटमधील डिवाइस बनवण्याबाबत एका प्रोजेक्टवर काम सुरू होते. डिवाइस तयार करण्याकरिता त्याने शिक्षकांची मदत घेतली. याबाबत निहाल सिंह आदर्श सांगतो की, मी काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट घातल्यानंतर होणारे त्रास मी पाहिले होते. त्यामुळे शरीराला गारवा मिळेल असे वेगळे कूल पीपीई किट तयार करण्याबाबत विचार करू लागलो.

माझी ही कल्पना महाविद्यालयाला आवडली. महाविद्यालयाने मला लॉकडाऊनच्या काळात पुण्यात राहून मुंबईतील महाविद्यालयाच्या या प्रकल्पाकरिता काम करण्याची परवानगी दिली. बऱ्याचदा एकदा वापरल्यानंतर पीपीई किट फेकून दिले जाते, पण या कूल पीपीई किटचे वैशिष्ट्य असे की, जेवढया वेळा पीपीई किट बदलले जाईल तेवढ्या वेळा त्यातील गारवा देणारी डिवाइस वापरता येऊ शकते. या डिवाइसची किंमत साडेचार हजार रुपये आहे.

सहजरित्या ती पीपीई किटमध्ये बसवता येते. 100 सेकंदांच्या आत ताजी आणि शुद्ध हवा हे डिवाइस वापरणाऱ्याला मिळते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. या डिवाइसचे नाव कोव-टेक (cov-Tech) आहे. हे डिवाइस तयार करण्याकरिता निहालला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून 10 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.