
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सर्वेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता सीमकार्डसाठी आधार कार्डची गरज नाही. त्यामुळे नवीन सीमकार्ड विकत घेण्यासाठी आता पूर्वीप्रमाणेच वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. कस्टमर व्हेरिफिकेशनसाठी 5 ते 6 दिवस लागू शकतात. त्यामुळे नवीन क्रमांक मिळण्यासाठी आता किमान आठवडा लागणार आहे.
टेलिकॉम कंपन्या आता ग्राहकांच्या केवायसी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागू शकत नाही. आधारमुळे अवघ्या 30 मिनिटांत कस्टमर व्हेरिफिकेशन व्हायचे आणि नवीन मोबाईल नंबर लगेच मिळायचा. आता आधार नसल्यामुळे ही सर्व पूर्वीप्रमाणेच किचकट आणि वेळखाऊ होणार आहे. पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. मोबाईल क्रमांकासाठी सोमवारी अर्ज केल्यास शुक्रवारपर्यंत तो सुरू होऊ शकणार आहे.
आधारचा तपशील सीमकार्डशी जोडणे बंधनकारक नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनेक नागरिक हा तपशील डि-लिंक करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन यूएआयडीएने एयरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन, आयडीयासह इतर दूरसंचार कंपन्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मोबाईल सीमकार्डची सत्यता पडताळण्यासाठी करण्यात येणारा आधारचा वापर कसा बंद केला जाईल. यावर 15 दिवसांत आपले म्हणणे मांडा, असे यूएआयडीएने सांगितले आहे.
पडताळणी कशी होणार
आता टेलिकॉम कंपन्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन करावे लागेल. ग्राहकांच्या पत्त्यावर जाऊन कागदपत्रे, सह्या घेऊन कागदपत्रे व्हेरिफिकेशन सेंटरला पाठवावी लागतील. यानंतर ग्राहकाला क्रॉस क्हेरिफिकेशन कॉल केला जाईल आणि त्यानंतरच मोबाईल क्रमांक सुरू होईल.




























































