
नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधात आता जगभरातील विद्यापीठांमध्येही तीव्र पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील हार्वर्डपासून ब्रिटनच्या ऑक्सफर्डपर्यंत विद्यार्थ्यांनी उग्र निदर्शने केली. दरम्यान, राजधानी दिल्ली पुन्हा पेटली आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. देशभरात मुंबई, पुणे, हैदराबाद, लखनौ, चेन्नईसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने सुरूच आहेत.
नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. रविवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील ग्रंथालयात घुसून पोलिसांनी लाठीहल्ला केला. याचे देशातच नाही तर विदेशातही पडसाद उमटले आहेत.अमेरिका, ब्रिटनमधील नामांकित विद्यापीठांमध्ये अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी, प्राध्यापकांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करीत जामिया मिलिया आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेतील हार्वर्ड, कोलंबिया, एमआयटी, स्टॅनफोर्ड, येल विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातही आंदोलन करण्यात आले. फिनलँड येथे विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानी दुतावासाला पत्र लिहून मारहाणीचा निषेध केला आहे.
देशभरात आंदोलन
सुधारीत नागरिकत्व कायद्याचा भडका पुन्हा राजधानी दिल्लीत उडाला. सीलमपूर-जाफराबाद भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दिल्ली परिवहन सेवेच्या बसेसची तोडफोड केली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्याने तणाव वाढला. पोलिसांनी हिंसक जमावाला पांगविण्यासाठी लाठीहल्ला करीत अश्रुधूराच्या नळकांडय़ा फोडल्या.
- दिल्लीत अनेक भागात तणाव वाढला असून, बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. मेट्रोची सात स्थानके बंद करण्यात आली आहेत.
- उत्तरप्रदेशात अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आंदोलन सुरुच आहे. आतापर्यंत 26 जणांना अटक केली असून, यात आठ विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मऊ येथेही 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- पश्चिम बंगालमध्ये रेल्वे रोको आणि रस्ता रोको आंदोलन सुरू आहेत. केरळ, तामिळनाडू, तेलंगणा येथेही विद्यार्थ्यांनी उग्र निदर्शने केली.
- ईशान्य हिंदुस्थानात आसाम, त्रिपुरामध्ये तणाव कायम आहे.
- 10 जण अटकेत; त्यात एकही विद्यार्थी नाही
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या 10 जणांमध्ये एकही विद्यार्थी नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अनेक देशांची ऍडव्हायजरी; हिंदुस्थानात काळजी घ्या
हिंदुस्थानात प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना अनेक देशांनी आपल्या नागरिकांना केली आहे. यासंबंधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि इस्त्र्ाायलने आपल्या नागरिकांसाठी ट्रायव्हल ऍडव्हायजरी जारी केली आहे.
हिंसाचाराच्या चौकशीची मागणी; सुप्रीम कोर्ट सुनावणीस तयार
नागरिकत्व सुधारीत कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. तसेच हिंसाचार भडकला. या हिंसाचाराची सीबीआय किंवा ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. यावर आज ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिका दाखल करून तत्काळ सुनावणीची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. तुम्ही उद्या यावर लक्ष वेधा, असे सरन्यायाधीश म्हणाले.
नागरिकत्व कायद्यावरून माघार नाहीच
दुसऱ्या देशातून आलेल्या शरणार्थींना आमचं सरकार नागरिकत्व देणारच आहे. त्यामुळे कितीही राजकीय विरोध करण्यात आला तरी कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.



























































