आसामात पुन्हा संघर्षाचे वारे; नागरिकत्वाचा प्रश्न भडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (‘एनआरसी’)च्या मुद्द्यामुळे आसामात ‘बोडो’ आंदोलनानंतर पुन्हा एकदा संघर्षाचे वारे वाहू लागले आहेत, तर दुसरीकडे तेथील बेकायदा नागरिक अरुणाचलमध्ये घुसतील या भीतीने तिथे घुसखोरांविरोधात उठाव सुरू झाला आहे. त्याच वेळी झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ‘एनआरसी’ अख्ख्या देशालाच लागू करा, अशी मागणी केल्याने वातावरण अधिकच तापले आहे.

आसामच्या एनआरसी यादीतून ४० लाख नागरिकांची नावे वगळल्याचा प्रश्न आता अधिकच चिघळला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्व विरोधकांची एकजूट करण्याची मोहीम उघडली असतानाच त्यांच्याच पक्षात आता त्यांच्या एनआरसीविरोधी भूमिकेला काही तृणमूल नेत्यांनीच आव्हान दिले आहे. पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष द्विपेन पाठक यांनी राजीनामा देऊन ममतांच्या भूमिकेलाच आव्हान दिले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी; आसाम प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (NRC) तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावे लागत असून आसामचे प्रदेशाध्यक्ष द्विपेन पाठक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीला पक्षाकडून वारंवार होणारा विरोध आणि भूमिकेवर नाराज होत त्यांनी राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही बंगाली आणि बिहारींना राज्याबाहेर काढून त्यांना निर्वासित करण्यात डाव आहे असा आरोप केला होता. द्विपेन पाठक यांनी हा आरोप फेटाळून लावत आपण याच्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. ‘टीएमसीने राष्ट्रीय नागरिक नोंदणी बंगालींना राज्याबाहेर काढण्यासाठी असल्याचे म्हटले आहे, मात्र मला हे अजिबात पटत नाही. यादीत अनेक नावे नाहीयेत, मात्र नागरिक त्यासाठी पुन्हा अपील करू शकतात’ असे ते म्हणाले.

सलग चौथ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प
नवी दिल्ली – एनआरसीच्या मुद्द्यावरून आज सलग चौथ्या दिवशीही सत्ताधारी भाजप आणि तृणमूल आमने सामने आल्याने राज्यसभेचे कामकाज ठप्प पडले. एनआरसीच्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून आणि एनआरसीबाबत गृहमंत्र्यांनी निवेदन करावे या मागणीसाठी तृणमूल काँग्रेसने सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कृषी विषयांवरील चर्चा गुंडाळत सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

आठ तृणमूल नेत्यांना सिल्चर विमानतळावर रोखले
आसाममध्ये नाटीनाला सिटीझन रजिस्टरचा (एनआरसी) विरोध करण्यासाठी पोहचलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदार आणि दोन आमदारांना गुरुवारी आसाम पोलिसांनी सिल्चर विमानतळावरच ताब्यात घेतले. या प्रकाराचा तृणमूल काँग्रेसने निषेध केला आहे. नागरिकांना भेटणे आणि त्यांच्या समस्या ऐकून घेणे हा लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे. सत्ताधारी भाजप आता तोही आमच्याकडून हिरावून घेणार का, असा सवाल तृणमूल खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी केला.

अरुणाचलमध्ये विद्यार्थी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात
आसाममधील एनआरसीचा अंतिम मसुदा आल्यावर यादीतून बाहेर काढण्यात आलेले बेकायदेशीर नागरिक अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करू शकतील या भीतीने आता ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट युनियन (आपसु) या राज्यातील प्रमुख विद्यार्थी संघटनेने अरुणाचलमध्ये बेकायदा राहणाऱ्या घुसखोरांनी १५ दिवसांत राज्य सोडावे असा इशारा दिला आहे. ‘आपसु’ने मुख्यमंत्री पेमा खंडू यांनाही राज्यांच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवून अरुणाचलमधील संभाव्य घुसखोरी रोखण्याची विनंती केली आहे. आसाम एनआरसीच्या घोषणेनंतर मेघालय आणि नागालॅण्ड या राज्यांनीही घुसखोरीच्या भीतीने आपल्या सीमांवर कडक पहारा तैनात केला आहे.

ममता पंतप्रधानपदासाठी भुकेल्या; काँग्रेसचा आरोप
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममतांवर तोफ डागली. ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदासाठी भुकेल्या असून त्या सरड्याप्रमाणे रंग बदलतात असे टीकास्त्र चौधरी यांनी सोडले.

वंशावळ सिद्ध न झाल्याने लाखो नागरिकांची नावे वगळली
गुवाहाटी – आसामचे अनेक नागरिक आपल्या कुटुंबाची वंशावळ (आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्याशी नाते) सिद्ध करू न शकल्याने त्यांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनमध्ये (एनआरसी) आपली नावे दाखल करता न आल्याचे उघड झाले आहे . आसामच्या ४० लाख नागरिकांना एनआरसीतून वगळून बेकायदा ठरवल्यामुळे संसदेपासून सडकेपर्यंत विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर आसामी सरकारी अधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.

तृणमूल नेत्यांना धक्काबुक्की; ममतांचा आरोप
आसामच्या सिल्चर विमानतळावर तृणमूल नेत्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तृणमूलच्या शिष्टमंडळात महिला नेत्यांचाही समावेश होता, असेही ममता म्हणाल्या.