पौष्टिक… चवदार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मीना आंबेरकर

पावसाची कुंद हवा… चमचमीत भजी नेहमीच खातो…
गरमागरम, पौष्टिक सुप्सची या हवेत मजा न्यारीच…

पाश्चात्य जेवणात सहसा सूप पिऊन जेवणाची सुरुवात करतात, पण अतिशय चवदार असलेल्या या पदार्थाचा उपयोग एवढाच मर्यादित नाही. अनेक प्रकारांनी त्याचा आस्वाद घेता येतो. जेवताना हलका आहार घ्यावयाचा असेल तर सूप आणि तोंडाला चव येण्यासाठी सुपाचा योग्य उपयोग होतो. आहार तज्ञांच्या मते सूप हे आरोग्यासाठी व शरीरपोषणासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यासाठी रोजच्या जेवणात याचा समावेश करणे आवश्यक आहे. पावसाळय़ात ज्येष्ठ व्यक्तींनी गरमागरम सूपाचा आस्वाद घेणे हे योग्य ठरते. कारण हा एक हलका व आरोग्यकारक आहार आहे. निसर्गाने आपल्याला भाज्या व फळांची भरघोस देणगी बहाल केली आहे. तिचा लाभ घ्यावयाचा असेल तर सुपासारख्या खाद्य प्रकाराचा सढळ हाताने आस्वाद घ्यायला हवा. तसा आस्वाद घेताना वेगवेगळय़ा चवीने विविध प्रकाराने ते कसे बनवता येईल हे आपण आज पाहणार आहोत. सूपासाठी

भाज्यांचा स्टॉक कशा रीतीने तयार केला जातो ते पाहूया.

साहित्य : २ लिटर पाणी, २ पातीचे चिरलेले कांदे, २ लहान गाजरे चिरून, १ बारीक चिरलेला लहान कांदा, २-३ तमालपत्रे, अर्धा कप चिरलेला कोबी, १ इंच दालचिनी तुकडा, ८-१० काळे मिरे, १ चहाचा चमचा आले, लसूण पेस्ट.

कृती : सर्व जिन्नस एकत्र करून उकळण्यास ठेवावे. उकळी आल्यावर गॅस बारीक करून मंद आचेवर साधारण अर्धा तास उकळावे. गॅस बंद करून गाळून घ्यावे. या मसालेदार पाण्याला स्टॉक म्हणतात. हे पाणी सुपासाठी वापरतात.

malnat

मलगटानी सूप

साहित्य : १ चमचा धणे, १ चमचा जिरे, २ चमचे खसखस, अर्धा चमचा हळद, २ कांदे, ३ लसूण पाकळय़ा वाटून, १ कांदा बारीक चिरून, अर्ध्या नारळाचे दूध, लिंबाचा रस, ४ कप पाणी.

कृपी : थोडय़ा लोण्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. वरील मसाल्याची पेस्ट करून पाण्यात घालावी. गाळून मसाल्याचे पाणी कांद्यात घालावे. नारळाचे दूध, मीठ, थोडे पाणी घालावे व उकळावे. प्रत्येक बाऊलमध्ये १ मोठा चमचा भात घालून त्यावर गरम सूप घालावे. त्यात मटण, चिकन स्टॉक वापरल्यास मांसाहारी सूप तयार होईल.

tomato

क्रीम ऑफ टोमॅटो सूप

साहित्य : अर्धा किलो मध्यम आकाराचे टोमॅटो, १ मोठा चमचा मैदा, २ कप दूध, १ मोठा चमचा साखर, १ चहाचा चमचा मिरपूड, १ चहाचा चमचा मीठ, मध्यम आकाराचा कांदा-बारीक चिरून, २ मोठे चमचे लोणी आणि ४ ते ६ कप पाणी.

कृती : टोमॅटो बारीक चिरून अर्धा कप पाण्यात शिजवून घ्यावे. मिक्सरमधून काढावे. मोठय़ा भांडय़ात लोणी घालून त्यात बारीक चिरलेला कांदा. गुलाबी, रंग येईपर्यंत परतावा नंतर मैदा घालून थोडा वेळ परतून त्यावर दूध हळूहळू घालून सारखे ढवळत राहावे. मिश्रण एकजीव झाले की त्यात टोमॅटो रस, पाणी, मीठ, मीरपूड, साखर घालून मंद आचेवर गरम करावे. उकळी यायच्या आधी गॅस बंद करावा. गरम गरम सर्व्ह करावे. आवडत असल्यास ब्रेडचे बारीक चौकोनी तुकडे कापून तळून सूपमध्ये घालावे.

narl

कॉर्न सूप

साहित्य : मक्याची कणसे तीन, लोणी एक डाव, मैदा दीड चहाचा चमचा, मीठ, मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, दूध अर्धा लिटर.

कृती : कणसे किसून थोडय़ा पाण्यात किस शिजवून घ्यावा. लोण्यावर मैदा परतावा. दूध घालून उकळावे. किस घालून उकळावे. इतर जिनसा घालाव्यात. चिकन स्टॉक 1 वाटी व उकडलेले चिकनचे तुकडे अर्धी वाटी घालावेत म्हणजे चिकन कॉर्न सूप तयार होईल.