
मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ओबीसी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या घोषणाबाजीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले होते. या कार्यक्रमामध्ये गोंधळाची शक्यता असल्याने मंगळवार रात्रीपासूीन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त भेदून ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी प्रचंड घोषणाबाजी केली. ऐनवेळी घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी ओबीसी कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेतले आहे.
बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात
धाराशिवमध्ये सरनाईकांसमोर घोषणाबाजी
दरम्यान, धाराशिवमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात खासापुरीतील ग्रामस्थांनी गोंधळ घातला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत असताना गावकऱ्यांनी स्थानिक प्रश्नांवरून घोषणाबाजी केली. वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कारवाई करत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी गावकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.