
ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची राज्य सरकारने फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलक प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रपुरात अकरा सप्टेंबरपासून ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी त्यांची प्रकृती खाली खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच राज्य सरकार मागण्या मान्य करत नसल्याने व आंदोलनाची दखल घेत नसल्याने संतापलेल्या ओबीसींच्या विविध संघटनांनी चंद्रपूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडला. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे देखील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून आंदोलनाची धग पेटली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर मराठय़ांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ओबीसींकरिता असलेले 72 वसतिगृह तातडीने सुरू करावीत, स्वाधार योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.



























































