ठसा –  डॉ. श्रीपाद चितळे

643

>> महेश उपदेव  

विदर्भातील ज्येष्ठ इतिहासतज्ञ, पुरातत्व संशोधक, लेखक व संस्कार भारतीचे माजी अ. भा. प्राचीन कला विद्या संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. चितळे म्हणजे एका सळसळत्या चैतन्याचे नाव हीच ओळख सार्थ ठरेल. नवयुवकांचे मार्गदर्शक, एक व्यासंगी अभ्यासक महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागपुरात ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता.

प्राचीन हिंदुस्थानी इतिहास संस्कृती व पुरातत्व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागातून वनस्पती संकलन कक्षप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. डॉ. चितळे म्हणजे एक संगणक होते. विदर्भातील कोणत्याही ऐतिहासिक किल्ल्याची अथवा पुरातन वास्तूबाबत ते धडधड माहिती द्यायचे. ‘सामना’मध्येही डॉ. श्रीपाद केशव चितळे यांनी विपुल लेखन केले होते. या विपुल लेखनातून त्यांनी अनेक ऐतिहासिक ठेव्याची माहिती वाचकांना दिली होती. ते व्यासंगी, अभ्यासू व त्यांच्या पुरातत्त्वविषयक संशोधनाला समर्पित असे व्यक्तिमत्त्व होते. विदर्भातील पुरातत्वीय अवशेष व प्राचीन स्थळांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. हा अभ्यास जनतेपर्यंत त्यांनी पोहोचविला. अनेक भागांत फिरून त्यांनी संशोधन केले आहे आणि जवळपास 38 पुस्तकं त्यांच्या नावाने आहेत. विदर्भातील कोरीव गुंफा, विदर्भ पर्यटन वैभव, विदर्भातील अष्टगणेश, 2500 वर्षांपूर्वीचा विदर्भ, महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती, गोंड समाजाचा इतिहास अशी 50हून अधिक त्यांची साहित्य संपदा आहे. त्यांचे 125 संशोधन प्रपत्र हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले आहेत.

डॉ. चितळे यांच्या या कार्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विद्वत गौरव पुरस्कार डॉ. वा. सी. मिराशी प्रतिष्ठानच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर स्वयंसेवक होते. रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या घराबद्दलचा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असायची. पुरातत्वविषयी माहिती देणारे व्याख्याने हा त्यांचा कायम छंद होता. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ते नेहमी आपल्या संस्कृतीबाबत माहिती द्यायचे. नागपुरात त्यांनी ‘हेरीटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. इतिहास हाच ध्यास होता. त्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले. एवढेच नव्हे तर, आपल्यासोबत इतरांनाही इतिहास अभ्यासाची गोडी लागावी यासाठीही त्यांनी अविरत प्रयत्न केले. इतिहास हा श्वास  असलेले व त्यासाठी झपाटलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. श्रीपाद केशव चितळे होते.

आपली प्रतिक्रिया द्या