
सामना प्रतिनिधी । हिंगोली
काँग्रेस आघाडीचे हिंगोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात माजी खासदार व माजी आमदार म्हणून मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाचा मिळकत दाखविताना उल्लेख केला नाही. आयकर विवरण भरले नाही याबाबत आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविल्याचा आक्षेप घेणारी याचिका या निवडणुकीतील उमेदवार त्रिशाला कांबळे यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केली आहे. अपक्ष उमेदवार त्रिशाला कांबळे व त्यांचे पती मिलिंद कांबळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या 18 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील त्रिशाला कांबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेस उमेदवार तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारी अर्जावर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेबाबत माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत त्रिशाला कांबळे व त्यांचे पती मिलिंद कांबळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे अपेक्षीत आहे. उमेदवारी अर्जात चुकीची अथवा अपूर्ण माहिती असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधीत उमेदवाराचा अर्ज बाद करणे अभिप्रेत आहे. याच धर्तीवर हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी काही उमेदवारांचे अर्ज रद्द केले. मात्र, काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारी अर्जातील माहितीवर आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर मेहरबाणी का दाखविली, असा सवाल कांबळे यांनी विचारला.
केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाची माहिती उत्पन्नाच्या स्त्रोतात वानखेडे यांनी दाखविली नाही. यासह अन्य काही मुद्द्यांवर आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाने ही याचिका दाखल करुन घेऊन 10 एप्रिल रोजी सुनावणी ठेवल्याचे कांबळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.





























































