ठाण्याच्या प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांना केराची टोपली, 270 जणांनी नोंदवला होता आक्षेप

ठाण्याच्या प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांना प्रशासनाने अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर २७० जणांनी आक्षेप घेतला होता. त्यापैकी एकही हरकती आणि सूचना बदल ण्यात आली नसल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रभाग रचनेला ठाणेकरांकडून विरोध करण्यात आला असतानादेखील राज्याच्या नगरविकास खात्याने निवडणूक आयोगाला ‘जैसे थे’ प्रभाग रचना सुपूर्द केली आहे.

अनेक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक ठाणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे पालिकाही सज्ज झाली आहे.

त्यानुसार हरकती आणि सूचना धाब्यावर बसवत पालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम करून शासनदरबारी पाठवल्या आहेत. त्यामुळे झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकापाठोपाठ ठाणे महापालिकेच्याही निवडणुका होणार आहेत. ठाण्यात निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनांवर नागरिकांकडून २७० हरकतींचा पाऊस पडला होता. त्या हरकतीवर गणेशोत्सवानंतर सुनावणीचा फार्स उरकून प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना शासनदरबारी सादर केली आहे.

दसरा संपताच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

ठाणे महापालिका प्रशासनाने नगसेवक सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या निश्चित केली. त्यानुसार ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभागांमध्ये सदस्यांची संख्या १३१ आहे. यात चार सदस्यीय प्रभागांची संख्या ३२ असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या १ असणार आहे. दरम्यान, दसरा संपताच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.