समुद्रातील प्राण्यांचे वर्गीकरण, खेकड्यांच्या प्रजातींना आक्षेप; मुरबेतील जिंदाल बंदराचा पर्यावरण अहवाल चुकीचा

मुरबे खाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जिंदाल बंदराबाबतचा पर्यावरणीय अहवाल चुकीचा असल्याचा आक्षेप सिंधू सह्याद्री फाऊंडेशनने घेतला आहे. या अहवालात अनेक चुका असल्याने तो तत्काळ रद्द करावा अशी मागणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या बंदरास मोरबा ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत हे विनाशकारी बंदर लादू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

जेएसडब्ल्यू फोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बंदर उभारण्याकरिता ठेका दिला आहे. बंदरामुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार असून शेतकरी आणि भूमिपुत्रांचे अस्तित्व धोक्यात येईल, तर मच्छीमारी व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. बंदराकरिता भराव टाकला तर आलेवाडी, नवापूर, नांदगाव, सातपाटी या किनारपट्ट्यांवरील गावे पाण्याखाली जाण्याचीदेखील भीती व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जिंदालच्या बंदराविरोधात मुरबे ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते.

या आहेत हरकती
भूषण भोईर यांच्या म्हणण्यानुसार ठाकूर कॉलेजतर्फे सादर केलेल्या सागरी व किनारी जैवविविधता अहवालात अनेक गंभीर चुका आहेत. शंख प्रजातींची चुकीची ओळख व नावे नमूद केली गेली आहेत, खडकाळ किनाऱ्यावर व समुद्रतळाशी आढळणाऱ्या प्राण्यांचे चुकीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर समुद्रतळातील मातीमध्ये आढळलेल्या खेकड्याच्या पायांच्या तुकड्यांना स्वतंत्र प्रजाती म्हणून नमूद करून चुकीची नोंदणी करण्यात आली आहे. प्राथमिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अक्षम्य चुका झाल्याने संपूर्ण अहवाल दर्जाहीन आणि पर्यावरणीयदृष्ट्या निकृष्ट असल्याची हरकत फाऊंडेशनने घेतली आहे.

मुरबे येथील प्रस्तावित बंदरासाठी ठाकूर कॉलेजने पर्यावरणीय परिणामासंदर्भात अहवाल तयार करून तो जेएसडब्ल्यू कंपनीला दिला. या कंपनीने तो अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे.

अहवालामध्ये अनेक चुका असल्याने तो रद्द करावा अशी मागणी सिंधू सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक भूषण भोईर यांनी केली असून यासंदर्भात पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना निवेदन दिले आहे.

नव्याने वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करून जैवविविधतेचा खरा व प्रमाणित अहवाल तयार करावा, त्यानंतरच प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी घ्यावी, अशी ठाम मागणी सिंधू सह्याद्री फाऊंडेशनने केली आहे.