
देशवासीयांना उद्देशून केलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी श्वान पाळण्याचा सल्ला दिला होता. यावर वडगाव बुद्रुक परिसरातील महिलेने फेसबुकवर ‘चला तर भक्तमंडळी, देशी कुत्री पाळायला सुरुवात करा! मालकाचा आदेश आहे. कुत्र्यासोबतचे फोटो टाकायला विसरू नका!’ अशी पोस्ट केली होती. महिलेच्या या पोस्टवर अश्लील कमेंट्स करणाऱ्य़ा तीनजणांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुद्रा मराठे, अमोल बाग आणि सारंग चपळगावकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत वडगाव बुद्रुक परिसरातील 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यात त्यांनी स्वदेशीचा वापर करण्यास सांगितले. नागरिकांनी श्वानदेखील स्वदेशी पाळावेत, असे सांगितले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. वडगाव बुद्रुक परिसरातील महिलेने याविषयी फेसबुकवर ‘चला तर भक्तमंडळी, देशी कुत्री पाळायला सुरुवात करा! मालकाचा आदेश आहे,’ अशी पोस्ट केली होती. या पोस्टवर तीनजणांनी अतिशय अश्लील अशा कमेंट्स केल्या होत्या. यामुळे संबंधित महिलेने सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास करिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके करीत आहेत.





























































