मिंधे, पालिकेवर प्रचंड नामुष्की… नाकर्तेपणा… समुद्राचे पाणी ‘गोडे’ करण्याचे टेंडर अखेर रद्द, कंत्राटदारच समोर येईनात

देवेंद्र भगत, मुंबई

मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी  शिवसेनेच्या पुढाकाराने मुंबईतील नागरिकांसाठी प्रस्तावित असणारा  समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा मनोरी येथे उभारण्यात येणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पासाठी वारंवार निविदा मागवूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट होते आहे.  यामुळे मिंध्यांच्या कार्यकाळात मुंबईचा विकास खुंटला यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या प्रकल्पातून मुंबईला दररोज 400 दशलक्ष लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार होते. यासाठी पालिकेचा पालघरमधील प्रस्तावित गारगाई धरण प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवून मनोरीच्या प्रकल्पाला गती दिली जाणार होती. या प्रकल्पामुळे पालिकेने गारगाई प्रकल्पात बुडिताखाली जाणारी तब्बल तीन लाख झाडे वाचणार असल्याची माहिती देत आपण श्रेष्ठ असल्याचे जगजाहीर केले होते.

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा प्रकल्पातून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे वाढलेले औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पालिका मुंबईसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधत आहे. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू होती. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे 3520 कोटींचा खर्च करणार होती. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज 200, तर दुसऱ्या टप्प्यात दशलक्ष 400 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मनोरी प्रकल्पाइतकेच 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणारा गारगाई प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत होते, पण मिंधे आणि भाजप सरकारच्या काळात शिवसेनेने प्रस्तावित केलेला प्रकल्प जाणीवपूर्वक बंद केल्याचे बोलले जात आहे.

हे प्रकल्प रखडले

  • झीरो प्रिस्क्रिप्शन सुविधा
  • मलबार हिल ह्युइंग गॅलरी
  • प्रमुख ठिकाणचा सायकल ट्रक
  • मुंबईचे सौंदर्यीकरण, स्वच्छ मुंबई
  • खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प
  • 100 टक्के बेस्ट इलेक्ट्रिक, एसी करणे
  • जिजाबाई भोसले उद्यानाचा कायापालट
  • सिमेंट रस्ते, खड्डेमुक्त मुंबई
  • नवी अद्ययावत रुग्णालये
  • ‘मागेल त्याला पाणी’.

 

 ‘गोड पाणी’ प्रकल्पासाठी सुरुवातीला याच ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारून प्रकल्पासाठी वीजनिर्मिती केली जाणार होती. शिवाय पालिकेच्या मोडक सागर धरणावरही सौरऊर्जा निर्माण करून या प्रकल्पासाठी वीजनिर्मिती केली जाणार होती.