आणखी तीन दिवस मुंबईकरांचा घामटा निघणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईकरांना गेल्या दोन दिवसांपासून असह्य उकाडय़ाने हैराण केले आहे. अचानक इतका उकाडा आला कुठून असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. ही ‘ऑक्टोबर हीट’ आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. पण ऑक्टोबर सुरू होण्यापूर्वीच निर्माण झालेल्या या उकाडय़ामागे गुजरात आणि राजस्थानातून येणारे उष्ण वारे कारणीभूत आहेत. आणखी तीन दिवस ते महाराष्ट्राच्या दिशेने वाहत राहणार असल्याने तोपर्यंत मुंबईकरांचा घामटा निघणार आहे.

मुंबईत उकाडा इतका वाढला आहे की सकाळी 11 नंतर घराबाहेर पडल्यावर अक्षरशः चटके बसतात. अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. बाहेरच नव्हे तर घरामध्येही गरम वाफा जाणवू लागल्या आहेत. पंखे, एसीशिवाय घरे, कार्यालयात बसणेही कठीण झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आणखी तीन दिवस मुंबईतील वातावरण असेच राहणार असून त्यानंतर उष्ण वारे ओसरण्यास सुरुवात होईल.