लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही- उच्च न्यायालय

1944

लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणं बलात्कार नाही, असं मत ओडिशा उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. बलात्कार कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ओडिशा उच्च न्यायालयासमोर दाखल झालेल्या एका खटल्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणात एका 19 वर्षांच्या आदिवासी तरुणीच्या तक्रारीवरून एका तरुणाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तरुणीच्या आरोपांनुसार, गेल्या चार वर्षांपासून ती आणि संबंधित तरुण यांच्यात शारीरिक संबंध होते. त्या दरम्यान ही तरुणी दोन वेळा गर्भवती झाली होती. या तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, तरुणाने तिच्या अजाणतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने लग्नाचं वचनही दिलं होतं. जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिला गर्भपात करण्यावर दबावही आणला होता. सत्र न्यायलयाने या प्रकरणी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

त्यानंतर या तरुणाने उच्च न्यायलयात धाव घेतली. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी काही अटी आणि शर्तींवर त्याचा जामीन मंजूर केला. त्याच वेळी बलात्कारविरोधी कायद्यावर एकदा विस्तृत चर्चा करताना, कोणत्याही आश्वासनाशिवाय स्वतःच्या मर्जीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हे बलात्कार कायद्याच्या अंतर्गत येऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या