
ओडिशा राज्यातून भ्रष्टाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने एका सरकारी कर्मचाऱ्याला तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली असून, त्यानंतर त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 4 कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिशा दक्षता विभागाच्या इतिहासात आतापर्यंत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक मोठी रोकड असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवारी दक्षता पथकाने परवानाधारक मोहंती नावाच्या कर्मचाऱ्याला एका कोळसा विक्रेत्याकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, कोळसा डेपोचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी मिळवून देण्यासाठी मोहंती यांनी लाचेची मागणी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत दक्षता विभागाने सापळा रचला आणि मोहंती यांना लाच स्वीकारताना बेड्या ठोकल्या.
अटकेनंतर मोहंती यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता त्यांच्या ड्रॉवरमध्ये 1.20 लाख रुपये सापडले. मात्र, पथकाने जेव्हा त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले. मोहंती यांनी घराच्या कपाटात आणि ट्रॉली बॅगमध्ये कोट्यवधींची रोकड लपवून ठेवली होती. या छाप्यात एकूण 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास यंत्रणांकडून केला जात आहे.





























































