ऑफिस बॉयचे अपहरण करून बांधकाम व्यावसायिकाला मागितली खंडणी, दोघांना अटक

बांधकाम व्यावसायिकाकडे ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या तरूणाचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणीभाई (वय 29) आणि राहूल बाळू घोरपडे (वय 22, दोघेरी रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साईकुमार शिवमुर्ती जावळकोटी (वय 51, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

वारजेतील बांधकाम व्यावसायिक साईकुमार यांच्या कार्यालयात एक मुलगा कामाला आहे. काल सकाळी त्याचे शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथून आरोपी आकाश उर्फ गनीभाईसह साथीदाराने जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी साईकुमार यांना फोन करून मुलाला सोडून देण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. साईकुमार यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. अपहरणकर्त्यांनी मुलाला येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये एका खोलीत कोंडून ठेवले होते. आरोपींमध्ये पैसे मागण्यावरुन वाद सुरु झाला. आरोपी एकमेकांशी भांडू लागले असल्याची संधी साधून मुलाने खोलीतून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या