
कोरोना महामारीमुळे देशभरात लागू झालेले लॉकडाऊन तसेच अनेक कंपन्यांनी स्वीकारलेल्या वर्क फ्रॉम होमच्या पर्यायामुळे देशभरात ऑफिससाठी जागेच्या मागणीत 30 ते 35 टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसचे विस्तारीकरण, इंटिरीयर्सच्या योजना ठप्प झाल्या असून देशातील सात प्रमुख शहरांमधील 14 टक्के कार्यालये रिकामी असल्याचे समोर आले आहे.
जेएलएल इंडिया आणि यूकेस्थित सॅव्हिल्स या मालमत्ता सल्लागार संस्थांनी वर्ष 2020 मध्ये कोरोना काळात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू या शहरांमधील कार्यालयीन जागेची मागणी व वापराविषयी सर्वेक्षण केले. या संस्थांनी काढलेल्या निष्कर्षानुसार ‘वर्ष 2020 मध्ये नवीन कार्यालयासाठी जागेच्या मागणीत 30 टक्क्यांची घट होऊन ती 36.34 दशलक्ष चौरस फुटांवर आली आहे. मागील वर्षी 2019 मध्ये या मागणीचे प्रमाण 51.62 दशलक्ष चौरस फूट इतके होते.’ लॉकडाऊनमुळे एप्रिल-मेपासून अनेक कार्यालयांची कन्स्ट्रक्शनची कामे बंद आहेत. वर्क फ्रॉम होमच्या पर्यायामुळे 45 ते 50 टक्के कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयांची विस्तार योजना पुढे ढकलली आहे.
जेएलएलच्या रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये कार्यालये रिकामी असल्याचे प्रमाण 12.8 टक्के होते. डिसेंबर 2020 मध्ये यात वाढ झाली आहे. सध्या 14 टक्के ऑफिसेस ओस पडली आहेत.
कार्यालयीन जागा भाडय़ाने देण्याचे प्रमाणही तब्बल 44 टक्क्यांनी घसरले आहे. 2020 मध्ये हे प्रमाण 25.82 दशलक्ष चौरस फुटांवर आले. 2019 मध्ये ते 46.5 दशलक्ष चौरस फूट होते.




























































