अंमलदारही आता सर्वांगिण सक्षम होणार, आयुक्तांचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलदारांना फौजदारपदी बढती मिळाल्यानंतर ते तपासकामात कुचकामी ठरू नये याची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. सहाय्यक फौजदार व अंमलदारांना ठाणे अंमलदाराचे काम देऊन त्यांना गुणात्मकदृष्टय़ा सक्षम करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

पोलिस दलात साधारणत: 25-30 वर्षानंतर पोलिस शिपायाला अंमलदार झाल्यानंतर फौजदारपदी बढती मिळते. परंतु मुंबई सारख्या शहरात 30 वर्ष काम केल्यानंतर फौजदारपदी बढती मिळालेल्या बहुसंख्य अंमलदारांना तपास कसा करावा, गुन्हे कसे दाखल करावे तशी कागदपत्रे बनवता येतच नाहीत. एफआयआर घेण्यासाठी त्यांची त्रेधातिरपिट उडते. स्टेशन हाऊसला बसलेला हा फौजदार गुन्हा दाखल करून घेण्यास घाबरतो,  असे प्रकार मुंबईतील पोलिस ठाण्यात सुरू असल्याकर दै. सामनाने प्रकाश टाकला होता. हा प्रकार यापुढेही तसाच चालू राहू नये आणि अंमलदार देखील सक्षम बनाका यासाठी  पोलिस आयुक्तांनी मोठे पाऊल उचलले आहे.  शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील पाच सहाय्यक उपनिरीक्षक अथवा अंमलदारांची निवड करून त्यांची प्रादेशिक स्तरावर ठाणे अंमलदार, गुन्हा नोंद करणे, निवडक गुन्ह्यांचा तपास आदी कामाबद्दल कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच अंमलदारांना त्याबाबतचे प्रशिक्षण देऊन पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गुन्हे यांनी संबंधितांना तपासाबद्दल सुचना देण्यास सांगण्यात आले आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. आयुक्तांच्या या धाडसी निर्णयामुळे पोलिस दल सक्षम करण्याच्या दृष्टीने मदत मिळणार आहे. मुंबईत फौजदार जे काम करतात ते काम आता अंमलदारांना देखील करण्याची संधी मिळणार आसल्याने पोलिस वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.