ओला आणि उबरचालकांच्या संपाने मुंबईकरांची प्रवासकोंडी

बाईक टॅक्सी नको, सरकारी मीटर दर लागू करा यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओला, उबरसारख्या अॅपआधारित टॅक्सी सेवांचे चालक संपावर गेले आहेत. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यांच्या संपामुळे बुधवारी सलग दुसऱया दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः मुंबई विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

अॅपआधारित टॅक्सींसाठी अॅग्रीगेटर धोरणाची तातडीने अंमलबजावणी तसेच नियमित टॅक्सी चालकांप्रमाणे वेतन समानता आदी मागण्यांसाठी ओला, उबर टॅक्सीचालकांनी संप पुकारला आहे. इंधन, वाहतूक व इतर दैनंदिन खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

काय मागण्या…

  • ओला, उबर, रॅपिडोचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करा.
  • बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको.
  • रिक्षा आणि कॅब परमीटवर मर्यादा आणा.
  • रिक्षा – टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वीत करा.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी आज सूचना जारी करण्यात आली. अॅपआधारित कॅब उपलब्ध नसल्याने पर्यायी व्यवस्था शोधा, असे आवाहन त्यात करण्यात आले आहे.