ओला, उबर यांना वाहतूक मंत्रालयाचा दणका, कमी गर्दीच्यावेळी 50 टक्क्यांपर्यंतच भाडे वाढीची मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅपआधारीत ओला आणि उबर सारख्या खाजगी टॅक्सींना आता कमी गर्दीच्यावेळी 50 टक्क्यांपर्यंतच भाडेवाढ करण्याची मूभा देण्यात आली आहे. तसेच विनाकारण सेवा रद्द केल्यास मूळ भाडेदरावर 10 टक्के कॅन्सलेशन चार्जेसचा भुर्दंड प्रवाशांना बसणार आहे. ओला, उबर अन्य मोबाइल अॅपआधारित खासगी टॅक्सींच्या सेवांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘मोटर वाहन अॅग्रीगेटर 2020’ नुसार नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानूसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅपआधारित खासगी टॅक्सींवर भाडेदरासह अन्य बाबींवर नियंत्रण नव्हते. हे नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून राज्य सरकारकडूनही लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

या मार्गदर्शक तत्त्वानुसार कमी गर्दीच्या वेळी 50 टक्क्य़ापर्यंत भाडेदर ठेवू शकतो. तर गर्दीच्या वेळी मूळ भाडेदरावर 1.5 टप्प्यात भाडेआकारणी करू शकता येणार आहे. याशिवाय खासगी प्रवासी टॅक्सींचे कमीत कमी मूळ भाडेदर हे तीन किलो मीटरपर्यंत असावी, अशीही सूचना यातून केली आहे.

चालक किंवा प्रवासी या सेवा आरक्षित केल्यानंतर त्या काही वेळातच रद्द केल्या जातात. त्यामुळे वादही होतात. विनाकारण सेवा रद्द केल्यास मूळ भाडेदरावर 10 टक्के याप्रमाणे रद्द करण्याचे शुल्क भरावे लागणार आहे.