हार्टअ‍ॅटॅकनंतर आदिवासी वृद्धाला झोळीतून नेले दवाखान्यात, इगतपुरीतील हृदयद्रावक घटनेने हळहळ

इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी या अतिदुर्गम आदिवासी भागातील 65 वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने कुटुंबीय झोळीतून नेत होते. मात्र मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्याआधीच दोन ओहोळ ओलांडावे लागले, दऱ्याखोऱ्यातून पायपीट करावी लागली, यात बराच वेळ गेल्याने वाटेतच रुग्णाचा मृत्यू झाला. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खैरेवाडी येथील बबन रावजी शेंडे (65) यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीय व ग्रामस्थ बांबूला बांधलेल्या झोळीतून त्यांना घेऊन जवळील चिंचले गावातील दवाखान्याच्या दिशेने निघाले. मात्र कच्चा रस्ताही नसल्याने त्यांना चार ते पाच किलोमीटरवरील मुख्य रस्ता गाठण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. दोन ओहोळ ओलांडल्यानंतर दऱयाखोऱयांतून वाट काढत ते चिंचले गावात पोहोचले. मात्र, त्यापूर्वीच शेंडे यांचा मृत्यू झाला. रस्त्याअभावी ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना कायमच जीवघेणा प्रवास करावा लागतो. वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला यांचे दवाखान्यात नेताना हाल होतात.

सरकारला आमचे हाल दिसत नाहीत का?

वेळेत उपचार मिळाले असते तर बबन शेंडे यांचा जीव वाचला असता. मात्र अतिदुर्गम भागात रस्ते, आरोग्य सुविधा या महत्त्वाच्या गोष्टीही आम्हाला मिळत नाहीत. अनेकदा रस्त्याची मागणी केली. मात्र पदरी फक्त आश्वासनेच पडली. हा सरकारी अनास्थेचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री, मंत्र्यांना आमचे गोरगरीबांचे हे हाल दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.