
>>नमिता वारणकर
1926 सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक जुन्या गायिकांनी पार्श्वगायनाची परंपरा समृद्ध केली. त्यांच्या गायनाची शैली, आवाजातील गेयता, माधुर्य, नाविन्य यामुळे त्या काळातील सुमधुर गाण्यांचा प्रभाव रसिकांवर आजही टिकून आहे. पारुल घोष, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबानेवाली, शमशाद बेगम, गीता दत्त, सुमन कल्याणपूर…यातील काही नावे, त्यांनी गायलेली गाणी तर आजच्या पिढीला माहितही नसतील. अशा अनेक गायिकांमुळे पार्श्वगायनाचे तंत्र संपन्न होत गेले. त्यांची नावे पार्श्वगायनाच्या पानांवरून कधीच पुसली जाणार नाहीत. आपल्या गायकीला ‘चिरगंधित’ ठेवणाऱ्या गायिकांच्या गेल्या 75 वर्षांतील प्रवासाविषयी ‘75 years journey of Female playback singers’ या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी माणिक एन्टरटेन्मेंटचे निर्माते, कार्यक्रमाचे सादरकर्ते अतुल अरुण दाते आणि गायिका-निवेदिका वैदेही मुळीक यांच्याशी साधलेला हा संवाद.
अखिया मिलाके जिया भरमाके चले नही जाना …ओ चले नही जाना, मिलके बिछड गयी अखियाँ, बूझ मेरा क्या नाव रे नदीकिनारे गाँव रे पिंपल झुमे मोरे आंगना ठंडी ठंडी छांव रे, ये कैसी अजब दास्ता हो गयी है…,आवाज दे कहा है …दुनिया मेरी जवा है, अफसाना लिख रही हू…, कभी तनहायीयोमे यू हमारी याद आएगी…, मेरे मेहबूब न जा…, तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, वक्त ने किया,… अशी एकापेक्षा एक मनाला निर्भेळ आनंद देणारी गाणी… या सुमधुर गाण्यांमध्ये कर्णमधुरता होती. गायिकांमधील भावामुळे ती आजही ह्रदयाला भिडतात..मनाला निर्भेळ आनंद देणारी गाणी, सुमधुर, कर्णमधुर, दमदार, रसिकांचे ह्रदय हेलावणाऱ्या दर्जेदार गाणी गाणाऱ्या गेल्या 75 वर्षांतील गायिका म्हणजे पारुल घोष, कानन देवी, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, शमशाद बेगम, सुरैय्या, उमादेवी (टुणटुण), जगतीत कौर, गीता दत्त, नुरजहॉँ, मुबारक बेगम, छाया गांगुली, सुधा मल्होत्रा ते अगदी आजच्या श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अनुराधा पौडवाल…अशा कितीतरी गायिकांची नावं घेता येतील. हिंदी सिनेमातून पार्श्वगायनापासून सुरू झालेल्या गायिकांच्या प्रवासात आज बरेच बदल झाले आहेत. प्रत्येक गायिकेच्या गाण्याचा ढंग, आवाजातली विविधता, संगीताचा अप्रतिम खजिना ज्या गायिकांमुळे आपल्याला लाभला त्या कशा घडल्या त्यांच्या मेहनतीला, स्मृतींना उजाळा देणारा ’75 Years journey of female playback singers’ हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी माणिक एन्टरटेन्मेंटचे निर्माते, कार्यक्रमाचे सादरकर्ते अतुल अरुण दाते सांगतात, हिंदी सिनेसंगीताचा अभ्यास करता करता ‘प्ले बॅक’ ही संकल्पना सुचली. प्लेबॅकचा खरा अर्थ पडद्यावर एका गायिकेने एका नायिकेसाठी किंवा एका गायकाने नायकासाठी गायलेली गाणी. (एका गायक किंवा गायिकेने एका नायक किंवा नायिकेसाठी पडदयावर (चित्रपटासाठी) गायलेली गाणी.) यामध्ये गायकांपेक्षा गायिकांची संख्या जास्त आहे. असं माझ्या लक्षात आलं. मग ही संकल्पना सुचली आणि जवळजवळ वर्ष-दीड वर्ष त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर असं ठरलं की, आपण आता हा कार्यक्रम करू शकतो; पण कोरोना संसर्गामुळे या कार्यक्रमाचं स्वरुप बदलून तो ऑनलाईन करुया, असं ठरवलं. याच दरम्यान माझी ओळख पालघरला राहणाऱ्या एका अप्रतिम गायिकेशी झाली. तिचं नाव वैदेही मुळीक. करोनाच्या काळामध्ये अनेक गायिकांपेक्षा एका प्रतिभावान गायिकेसोबत हा कार्यक्रम करण्याचे मी ठरवले आणि वैदेहीची निवड निश्चित झाली. ही संकल्पना कार्यक्रम बघणाऱ्या अनेक लोकांना आवडली असे फोन येतात. याचे श्रेय हा कार्यक्रम घडण्यासाठी वैदेही आणि तिच्या आईवडिलांनी जी मेहनत घेतली. त्यांनाही जाते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिकांच्या गेल्या 75 वर्षांच्या प्रवासाविषयी कार्यक्रमाची गायिका आणि निवेदिका वैदेही मुळीक सांगते, पूर्वीच्या गायिका स्वत: अभिनय करून चित्रपटात लाईव्ह (प्रत्यक्ष) गायच्या. आजच्या तरुण प्रेक्षकांना पारुल घोष, काननदेवी, अमीरबाई कर्नाटकी अशा जुन्या गायिकांनी गायलेली आणि 40-50 जाऊ दे; पण 60-70 च्या दशकातली गाणीही माहीत नसतील किंवा त्यांची नावंही त्यांनी कधी ऐकली नसतील. त्यामुळे या कार्यक्रमात गेल्या 75 वर्षांपूर्वीच्या गायिकांपासून ते अगदी हल्लीच्या म्हणजे 2018 पर्यंतच्या म्हणजे सुनिधी चौहान, श्रेया घोषाल या सगळ्या गायिकांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्यांविषयी माहिती मिळेलच, शिवाय त्या गायिका कशा घडल्या, त्यासाठी त्यांना घ्यावी लागणारी मेहनत असा त्यांचा प्रवासही उलगडत जाईल. या प्रवासाविषयी विचार करायला लागले तेव्हा बऱ्याच गायिकांची नावं मला माहीत नव्हती. काही नावं कधी ऐकलीही नव्हती. त्यांच्याविषयी अभ्यास करत असताना या गायिकांची माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यांच्याविषयी वाचलं, ऐकलं. पूर्वीच्या काळी बोलपट होते. तिथे गाण्याचा फार उपयोग होत नव्हता. त्या काळी संगीताचा वापर चित्रपटांमध्ये नव्हता. नंतर गाण्याचा वापर चित्रपटात होऊ लागल्यानंतर सेटवर वाद्यांच्या साथीने रेकॉर्डिंग केलं जायचं. नाट्यसंगीत जसं रंगमंचावर रसिकांसमोर सादर केलं जातं तसंच चित्रपटांमध्ये ऑन स्टेज गाणी रेकॉर्ड व्हायची. तशीच ती चित्रपटात यायची. पहिल्यांदा हिंदी चित्रपटाकरिता पारुल घोष या गायिकेने प्ले बॅक (पार्श्वगायनाला) सुरुवात केली. त्यानंतर पुढे ही पद्धत विकसित होत गेली. सुरुवातीला गायिकाच अभिनेत्री असायच्या. कारण तेव्हा पद्धत अशी होती की, सेटवरच गायचं त्यामुळे गाणारी अभिनेत्रीच असायची. यासाठी गाणारी आणि अभिनय करणारी असे दोन्ही कलागुण असलेली व्यक्ती ही ‘अभिनेत्री’ म्हणून त्या काळी मानली जायची.
लताजींच्या उदयानंतर नाजूक आणि जी कुठल्याही सप्तकात गाऊ शकते, अशी मंजूळ गळ्याची नायिका आल्यानंतर सुरुवातीच्या गायिकांचं थोडंसं पारडं कमी व्हायला लागलं. त्यामुळे लताजींच्या आधीचं युग, लताजींचं युग आणि लताजींच्या नंतरचं युग असे तीन भाग या प्रवासात पडतात. 1915 नंतर 1980 सालापासून वेगळ्या आवाजाच्या, वेगळ्या टोनच्या गायिका गाऊ लागल्या. यामध्ये अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, चित्रा ते आतापर्यंतच्या श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, मोनाली ठाकूर या गायिकांच्या आवाजात खूपच वेगळेपणा आहे. त्यामुळे त्या आवाजांचं नाविन्य, सादरीकरणातले पैलू आजही टिकून राहिले आहेत.
गायिकांच्या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या सादरीकरणाकरिता ज्यांची नावंही माहित नाहीत किंवा ज्यांच्याविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे, असे असूनही गेल्या 75 वर्षातील गायिकांचा शोध घेऊन त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण किस्से, घडामोडी, गायनशैलीचा प्रवास, माहिती मिळवणं, सादर करणं, यासाठी काय मेहनत घ्यावी लागली ? या प्रश्नाबाबत तिचे म्हणणे आहे की, माझ्याकडे शास्त्रीय संगीताशी संबंधित बरीच पुस्तकं होती, पण लाईट म्युझिक, चित्रपटातील संगीताशी संबंधित हवी तेवढी पुस्तकं नव्हती. हा विषय निघाल्यावर मी पहिल्यांदा विकिपिडियावर माहिती मिळवली. चांगली पुस्तकं शोधायला सुरुवात केली. ‘रोमान्सिंग विथ द साँग’, ‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ’, अशोक रानडेंचं ‘हिंदी फिल्म म्युझिक’ किंवा हिंदीतलं ‘ ये उन दिनोंकी बाते है’ वगैरे अशी सुंदर सुंदर पुस्तकं या लॉकडाऊनच्या काळात मला वाचायला मिळाली. अशोक रानडेंच्या पुस्तकात तर त्यांनी गायकांचा सुंदर आढावा घेतला आहे. गायकाचा आवाज, गाणं याबाबत शास्त्रीयदृष्ट्या खूपच छान माहिती त्यांनी दिली आहे. त्याची मदत झाली. मुख्य म्हणजे विकिपिडीयामध्ये काही जुन्या गायिकांची माहिती नव्हती मग अशा वेळी त्यांच्या सोबत काम केलेल्या लोकांनी त्यांच्याविषयी बोललेलं असं काही मिळतंय का किंवा युट्युबर मुलाखती मिळतात का ? असा शोध घेऊन आवश्यक तेवढी माहिती रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच बाबतीत असं लक्षात आलं की, पुस्तकांमध्ये गायिकांच्या गायन कक्षेपेक्षा त्यांच्या आयुष्यातील ट्रॅजेडीवर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य उघड करण्यापेक्षा त्यांच्या पार्श्वगायनाच्या प्रवास, त्यांचं कलेसाठी घडणं याबाबतच माहिती दिली आहे. यामध्ये काननदेवी, पारुल घोष, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, राजकुमारी दुबे, नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, गीता दत्त, सुधा मल्होत्रा, सुमन कल्याणपूर, मुबारक बेगम, जगजीत कौर, आशा भोसले आणि लता मंगेशकर , टुणटुण (उमादेवी), अनुराधा पौडवाल, छाया गांगुली, हेमलता, साधना सरगम, यांच्यापासून आताच्या सगळ्या गायिकांचे किस्से आणि सुप्रसिद्ध गाणी ऐकायला मिळतील.
प्रत्येक गायिकेची विशिष्ट गुणवैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीच्या गाण्याचे अनेक पैलू आहेत. सुदैवाने मला खूप चांगले गुरु मिळाले. त्यांनी मला शास्त्रीय संगीतात शब्दाला किती महत्त्व आहे हे शिकवलं. शास्त्रीय संगीत हे सुरांशी संबंधित आणि सूरप्रधान आहे, तर भावगीत हे शब्दप्रधान आहे. त्यामुळे कायम शब्द आणि त्याच्यामागचे भाव याचा विचार करणं मला सुरुवातीपासून खूप आवडत असे. अशी गायकी मला गीता दत्त, सुरैय्या, सुमन कल्याणपूर यांच्यामध्ये आढळते. या गायिकांमध्ये शब्दांमधील भाव प्रकट करण्याची अफाट शक्ती आहे. जी सगळ्यांकडे नसते. सुरांमध्ये गाणं आणि सुरांनी ते गाणं रसिकांपर्यंत पोहोचवणं, भावाने रसिकांपर्यंत एखादं गाणं पोहोचवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे भावाने एखादं गाणं जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतं तेव्हा त्यामध्ये फार हरकती नसल्या, स्वरांची सर्कस नसली तरी निव्वळ साधेपणाने व्यक्त झालेले शब्दसुद्धा लोकांना भिडतात, असं तिचं म्हणणं आहे.
कोणत्या गायिकेचे कलागुण विशेष जास्त भावले आणि का ? यावर वैदेही सांगते की, मला विचारशील तर लता मंगेशकर आणि आशा भोसले शिरसावंद्य आहेतच, पण बाकीच्या गायिकांमध्ये इतकी विविधता आहे की, प्ले बॅक सिंगीगच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे; कारण तुम्ही फक्त गात नसता तर तुमचं गाणं हे येणाऱ्या अभिनेत्रीकडून सादर होणार असतं. भावनांनी व्यक्त होणाऱ्या गायिकांमध्ये गीता दत्त (वक्त ने किया क्या हसी सितम), सुरैय्या ( ये कैसी अजब दास्ता हो गयी), सुमन कल्याणपूर या सगळ्या माझ्यासाठी हॅटस ऑफ सिंगर्स आहेत. त्यांनी गायलेली गाणी ऐकताना ह्रदय हेलावतं. या गायिका मला खूप आवडतात. या गायिकांमध्ये शब्द आणि भावना योग्यरित्या गाण्यांतून व्यक्त करण्याची प्रचंड शक्ती आहे. जी सगळ्यांकडे नसते.
गायिकेचा आवाज आणि नायिकेची व्यक्तिरेखा
नायिकांना गायिकांचे आवाज सूट होणं यामध्ये पूर्वीच्या आणि आताच्या काळानुसार काय बदल झालाय असं तुम्हाला वाटतं, या प्रश्नाला उत्तर देतात की, लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम यांच्या काळात जी स्त्री दाखवली जात होती ती सुसंस्कृत आणि अतिशय सोज्वळ, साधी, अदबीनं वागणारी अशी होती. या गायिकांचे आवाज तेव्हाच्या काळातल्या अभिनेत्रींना साजेसे होते, मात्र आता बदलत्या काळानुसार आताच्या सिनेमातली नायिका ही थोडीशी अग्रेसिव्ह किंवा स्वत:चं मत ठामपणे मांडणारी अशी धाडसी स्त्री आहे. त्यामुळे घोगऱ्या आवाजाची किंवा जाड आवाजाची गायिका जरी असली तरी ती आजच्या नायिकांना शोभून दिसते कारण आजची नायिका तितक्याच तडफेने वागणारी दाखवता येते. अर्थात व्यक्तिरेखेप्रमाणे आवाजाही बदलत गेल्याचे लक्षात येते. चित्रपटांमध्ये होणाऱ्या या बदलांचा परिणाम संगीतावरही झाला. त्याच्यामुळे पर्यायी गायिकांच्या गायकीमध्येही बदल होत गेला. असे असले तरी आता पुन्हा आपण मागे जात आहोत, असं दिसतय. कारण हल्ली चित्रपटांत अभिनय करणाऱ्या काही अभिनेत्री पुन्हा एकदा गायला लागल्या आहेत. सुरुवात गायिका अभिनेत्रींपासून झाली आणि आता पुन्हा एकदा गायिका अभिनेत्री म्हणून उदयाला येत आहेत. हे वर्तुळ पूर्ण होतंय असं वाटतंय.
रसिकांनी कार्यक्रम का बघावा?
या कार्यक्रमातून तुम्हाला काय मिळेल ? यावर वैदेहीचं म्हणणं आहे की, मुळात हा उद्देश नव्हता की, लोकांनी या कार्यक्रमातून काहीतरी घ्यावं. पण जशा नवीन गोष्टी हातात येतात आपण पूर्वीच्या गोष्टी विसरून जातो. रसिकांच्या गाणी लक्षात राहतात, पण ज्या गायिका गातात त्यांचा चेहरा लक्षात राहात नाही. त्याऐवजी समोर दिसणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा लक्षात राहतो, कारण ती दृष्यस्वरुपातली गोष्ट आहे. तुम्ही रेडियोवर जोपर्यंत गाणी ऐकत होता तोपर्यंत रेडियोवरच्या गाण्यांमुळे गायिकेचं नाव कळत असे. त्यानंतर रेडियो हळूहळू कमी व्हायला लागला. टीव्ही आणि थिएटर्सचं प्रमाण अधिक व्हायला लागलं तेव्हा अभिनेत्री कोण आहे, असं म्हटलं की, श्रीदेवीचं हवाहवाई हे गाणं कविता कृष्णमूर्ती गातेय हे लक्षात येत नाही. हे जे विस्मृतीत गेलेले आवाज म्हणजे ही गाणी. त्यामागे कोणाचं संगीत आहे, हे विचारायला गेलं तर सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही. त्यामुळे एक एक गाणं घडण्यासाठी गायिकांनी जे कष्ट घेतले आहेत त्यांना उजाळा देणं हा एकमेव उद्देश या कार्यक्रमामागे आहे. त्यामुळे 1926 पासून 2010 सालापर्यंतच्या गायिकांची गाणी, याविषयीचे पूर्वी कधीही न ऐकलेले रंजकदार किस्से आम्ही यामध्ये मांडले आहेत. 1926ला ज्यांनी पहिल्यांदा आपल्या आयुष्यात गाणं म्हटलं तेव्हापासूनच्या आतापर्यंतच्या 30 गायिकांची सुमधुर गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. महत्त्वाचे म्हणजे सेटवर वाद्य घेऊन प्ले बॅक सिंगीगचा सुरू झालेला हा प्रवास त्यामध्ये आजतागायत झालेले बदल हे सगळं लोकांना उलगडून दाखवणं आवश्यक होतं. यासाठी चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं आणि ते गाणं गाणाऱ्या गायिकांचा प्रवास, त्यांची मेहनत लोकांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पोहोचवली आहे. गायिकांची निवडही अशी केली आहे की, ज्यांचं हिंदी प्ले बॅक संगीतावर (पार्श्वगायनावर) वेगळं साम्राज्य आहे, अशा 30 गायिकांची निवड याकरिता केली आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा पूर्वीच्या आठवणीत रमता येईल. आनंद अनुभवता येईल.





























































