नाशिकमध्ये वाडा कोसळला; एकाचा मृत्यू, पाच जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

जुने नाशिक भागातील तांबट लेन येथे आज दुपारी चारमजली वाडा कोसळल्याने सहाजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यापैकी करण घोडके या तरुणाचा मृत्यू झाला. इतर पाचजणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तांबट लेन येथे संजय शांताराम काळे यांचा वाडा आहे. वाडा मोडकळीस आल्याने पडण्याच्या स्थितीत होता. हा धोका ओळखून काळे कुटुंबीय आज दुपारी घरातील सामान हलवून इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या प्रयत्नात असतानाच एकच्या सुमारास वाडा कोसळला. संजय काळे, चेतन पवार, आशा संजय काळे, काजल संजय काळे, करण राजेश घोडके, समर्थ संजय काळे हे माती-विटांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने चार तासांच्या प्रयत्नांनंतर या सर्वांना बाहेर काढले. त्यापैकी करण घोडके याचा मृत्यू झाला असून इतर पाचजणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजे छत्रपती कला, क्रीडा मंडळाचे शंकरराव बर्वे, अरुण मोरे, गणेश बर्वे, राहुल बर्वे, दीपक कुंभकर्ण, पिंटू कुंभकर्ण, भूषण कुंभकर्ण, नितीन कुंभकर्ण, राहुल शेलार, बबलू बोराडे, अनिकेत भागवत, अतुल काळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक शाहू खैरे, दिनकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेच्या निमित्ताने नाशिकमधील धोकादायक घरे आणि वाडय़ांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रतिवर्षी पावसाळय़ापूर्वी नोटिसा देवूनही रहिवाशी येथेच राहत असल्याने त्यांच्या जिवाला धोका वाढत आहे.