चोराने तोंडावर बुक्का मारल्याने कवळी घशात अडकली, वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

एका चोरामुळे कोलंबियातील मेडेलीन भागात राहणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गॅब्रिअल डी जिझस पल्गारीन बोलिव्हर असं या व्यक्तीचं नाव असून तो 71 वर्षांचा होता. गॅब्रिअलला लुटण्याच्या उद्देशाने एक चोर त्याच्या दिशेने आला होता. चोराने गॅब्रिअलकडे त्याचा मोबाईल फोन मागितला होता. आपला नवा कोरा मोबाईल कसा द्यायचा या विचारात असलेल्या गॅब्रिअलच्या तोंडावर जोराने बुक्का मारला होता.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय की गॅब्रिअल त्याचा गळा आवळून मटकन बाकड्यावर बसला होता. एकाने धावत जाऊन त्याला पाणी आणलं होतं. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी गॅब्रिअलला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. चोराने तोंडावर बुक्का मारल्याने गॅब्रिअलची कवळी त्याच्या घशात अडकली होती. यामुळे गुदमरल्याने गॅब्रिअलचा जीव गेला. गॅब्रिअलच्या मृत्यूनंतर त्याच्या तोंडावर बुक्का मारणाऱ्या आणि त्याचा मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.