६३ व्या वर्षी पाच गर्लफ्रेंड्स, खर्चासाठी करत होता चोरी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या गाण्याला साजेशी अशी व्यक्ती दिल्लीत आहे. बंधू सिंह असे त्याचे नाव असून त्याचे वय ‘६३’ आहे. देवाचे नाव घेण्याच्या वयात तो मात्र प्रेमात आकंठ बुडाला आहे. त्याच्या एक दोन नव्हे तर चक्क पाच प्रेयसी आहेत. त्यांना खूष करण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून त्याने चोरीचा मार्ग स्विकारला. पण त्यातच तो अडकला आणि चोरी करताना पोलिसांनी त्याला पकडले. २८ जून रोजी दिल्लीच्या सराय रोहिल्ला या औद्योगिक परिसरात एका कारखान्यात बंधू सिंग चोरीच्या उद्देशाने टेहळणी करत होता. पण कारख्यान्यातील सीसीटीव्हीत तो कैद झाला. सीसीटीव्हीतील फुटेज पाहून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्याकडून दोन लॅपटॉप, एक एलईडी आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांनी तपास केल्यावर बंधू सिंग कडून चोरीचे अजबच कारण कळाले. बंधू सिंगच्या पाच प्रेयसी आहेत. त्यांच्यावर खर्च करण्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग स्विकारला. मुलींवर छाप पाडण्यासाठी महाशय आजही जिम मध्ये जातात, केसही काळे करतात. पोलिस मागील चार चोरीच्या प्रकरणात बंधू सिंग यांच्या शोधात होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहून आणि प्रत्यक्षदर्शीने खात्री पटवल्यावर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.