
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने 7 ते 8 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट त्याच्या आता अंगलट आली आहे. लिंगभेद आणि वर्णद्वेषी ट्विट केल्याबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत ओली काउंटी क्रिकेट खेळू शकणार आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित
न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर कसोटीत पदार्पण करणाऱया ओलीवर सामना झाल्यानंतर इंग्लंड बोर्डाने कारवाई केली. ओलीची चौकशी होईपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर 2012 आणि 2013मध्ये ट्विटवर केलेल्या पोस्टवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्या वेळी ओलीने लिंगभेद आणि वर्णद्वेषी ट्विट केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने व्हिडिओद्वारे संबंधित ट्विटबद्दल माफी मागितली होती. मला माझ्या कृतीबद्दल वाईट वाटते आणि अशा पद्धतीची टिप्पणी केल्याबद्दल मला लाज वाटते. माझी मते ही विचारशून्य आणि बेजबाबदार होती. माझे ते बोलणे माफीयोग्य नव्हते, असे तो म्हणाला होता.
इंग्लंडने कसोटी वाचवली
इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी वाचविण्यात यश मिळविले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने डेव्हन कॉनवेच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 378 धावसंख्या उभारली होती. मात्र प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव 275 धावांत संपुष्टात आला होता. यात सलामीवीर रोरी बर्न्सने 132 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात 103 धावांची आघाडी मिळालेल्या न्यूझीलंडने दुसरा डाव 6 बाद 169 धावांवर घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 273 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र इंग्लंडने नांगर टाकून फलंदाजी करताना 70 षटकांत 3 बाद 170 धावसंख्येपर्यंत मजल मारून कसोटी ड्रॉ करण्यात यश मिळविले. पदार्पणाच्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे या कसोटीचा मानकरी ठरला.
पदार्पणाच्या कसोटीत घेतले 7 बळी
भूतकाळातील लिंगभेद आणि वर्णद्वेषी ट्विटमुळे चर्चेत आलेल्या ओली रॉबिन्सनने पदार्पणाच्या कसोटीत 7 बळी टिपत सामना ड्रॉ करण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात ओलीने 28 षटकांत 75 धावा देत 4 बळी टिपले, तर दुसऱया डावात 14 षटकांत 26 धावा देत 3 गडी बाद केले. पदार्पणाच्या कसोटीत लक्ष्यवेधी कामगिरी करणाऱया ओलीवर मात्र ‘ईसीबी’ने सामन्यानंतर थेट निलंबणाची कारवाई केली.
पर्यायी क्रिकेटपटूंचाही विचार
आंतरराष्ट्रीय दौरे, कुटुंबासोबतचा वेळ यांसारख्या कारणांमुळे काही परदेशी क्रिकेटपटूंची आयपीएलमध्ये अनुपस्थिती असू शकते. याचाही विचार बीसीसीआय करीत आहे. अशा परदेशी क्रिकेटपटूंसाठी पर्यायी क्रिकेटपटूंची निवड करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी संघांचे कॉम्बिनेशन बिघडू नये याची काळजी घेतली जाईल.





























































