ऑलिम्पिकमध्ये 90 मीटर भाला फेकायचाय! नीरज चोपडाचा निर्धार

टोकिओ ऑलिम्पिकमध्ये 90 मीटर भालाफेक करायची आहे, असा निर्धार हिंदुस्थानचा स्टार अॅथलिट नीरज चोपडाने व्यक्त केला. यासाठी आपण मजबुती आणि तंत्रावर खूप मेहनत घेत आहोत, असेही त्याने सांगितले. एशियन चॅम्पियन व राष्ट्रकुलमधील सुवर्णपदकविजेत्या नीरजकडून देशवासीयांना टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा आहे.

नीरज चोपडा सध्या भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये सराव करीत आहे. त्याने याआधीच ऑलिम्पिकची पात्रता मिळविलेली आहे. चोपडा म्हणाला, पूर्वी 70 मीटर भालाफेक उत्तम मानली जायची. त्यानंतर 80 मीटरचे टार्गेटही पार होऊ लागले.

मात्र आता पदक पाहिजे असल्यास 90 मीटर भालाफेक करावीच लागेल. 90 मीटर भाला फेकला तरच तुमची आघाडीच्या खेळाडूंमध्ये वर्णी लागणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही कामगिरी गाठण्यासाठी सध्या मी कठोर मेहनत घेत आहे, असेही नीरज  म्हणाला.

तयारीचा अंदाज घेणार

कोरोनामुळे टोकिओ ऑलिम्पिक रद्द होऊ शकते, अशा बातम्यांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑलिम्पिकपूर्वीची प्रत्येक स्पर्धा ऑलिम्पिकची रंगीत तालीम असेल, मात्र काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्येच सहभागी होऊन आपली तयारी योग्य दिशेने सुरू आहे की नाही याचा अंदाज घेणार असल्याचे नीरज म्हणाला.

कोरोनामुळे मायदेशातच सराव

याआधी दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑलिम्पिकची तयारी करण्याची योजना होती, मात्र कोरोनाच्या साथीमुळे आता मायदेशात तयारीला प्राधान्य दिले आहे.

मार्चनंतर फिनलॅण्ड व जर्मनीमध्ये जाऊन सराव करणार आहे. त्याआधी फेबुवारीत फेडरेशन कप व मे महिन्यात डायमंड कप स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे नीरज चोपडाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या