
मुंबईतील प्रसिद्ध कलाकार ओम स्वामी यांचे ‘आराध्या – दि डेइटी’ हे अनोखे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल. या प्रदर्शनातून ओम स्वामी हे लहान अंध मुलींना गणेशमूर्ती घडवण्याचे आणि चित्रकलेचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यातून या मुलींना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. वरळी येथील ऑट्रिया मॉलमधील वाची आर्ट गॅलरी येथे 4 ते 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीतदेखील प्रदर्शन असेल.
ओम स्वामी स्वयंशिक्षित, लोकप्रिय कलाकार आहेत. ‘आराध्या – दि डेइटी ’ या प्रदर्शनात त्यांची 19 आकर्षक पेंटिंग्ज आणि 15 मनमोहक शिल्पांचा संग्रह आहे. ही सर्व चित्रे आणि शिल्पे भगवान गणेश या संकल्पनेवर आधारित आहेत. कलारसिकांना ही पर्वणी आहे.
ओम स्वामी यांचे गणेशाच्या कलाकृतींबद्दलचे आकर्षण त्यांच्या लहानपणाच्या दिवसांपासून आहे. लहानपणी ते स्वतः शिल्पकारांना बराच वेळ गणेशमूर्ती साकारताना पाहत असायचे. त्यामुळेच गणेश ही त्यांच्या कलेची मध्यवर्ती संकल्पना आहे. आगामी प्रदर्शनाबद्दल ओम स्वामी म्हणाले, दृष्टी नसणे हा अडथळा नसून एक अनोखा दृष्टिकोन आहे. तसेच आव्हानांना सामोरे जाताना ज्या सहजतेने या मुली सामोऱया जातात, त्या सहजतेचा हा उत्सव आहे आणि त्याचा गौरव या उपक्रमातून करण्याचे माझे उद्दिष्ट आहे.































































