
डोंबिवली, पुण्यापाठोपाठ कोरोनाचा ओमायक्रोन व्हेरिएंट मुंबईतही दाखल झाल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत 25 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्गमधून आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला व अमेरिकेहून आलेल्या त्याच्याच 36 वर्षीय मैत्रिणीला ओमायक्रोनची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांपैकी आतापर्यंत 320 लोकांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यातील ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या दहावर पोहोचली असून धोका वाढला आहे.
दोनच दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या डोंबिवलीतील एका तरुणाला ओमायक्रोनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ पुण्यात व पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे सात रुग्ण आढळून आले. या ओमायक्रोनच्या विषाणूने आता मुंबईतही शिरकाव केल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. मुंबईतील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 320 लोकांचा शोध घेण्यात आला असून आणखी लोकांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू आहे.
ओमायक्रोनचा धोका लक्षात घेऊन 1 डिसेंबरपासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 34700 प्रवाशांपैकी 6263 प्रवासी हे ओमायक्रोन बाधित देशांतून आले असून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. अन्य देशांतील 635 प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यातील 11 जणांचे नमुने हे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नोव्हेंबरमध्ये आलेल्या प्रवाशांनीही आरोग्य विभागाला कळवावे
1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचाही आरोग्य विभागाकडून शोध सुरू आहे. अशा प्रवाशांपैकी 34 जणांच्या स्वॅबचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोरोनाच्या निलमांचे पालन करावे. आपले लसीकरण पूर्ण करावे व मागील महिन्यात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनी स्थानिक आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
लसीचे दोन्ही डोस घेऊनही लागण
मुंबईत आढळलेल्या या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतले होते. या दोघांमध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसून त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना निर्बंधांना विरोध चैत्यभूमीवर गोंधळ
चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रीघ लागली होती. मास्क न लावलेल्या अनुयायांना पोलिसांकडून हटकण्यात येत होते. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला आणि झटापट केली. आत सोडण्यात आल्यानंतरही त्यांनी तिथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी या गोंधळ घालणाऱयांना तत्काळ तिथून बाहेर काढले व चैत्यभूमीवर बंदोबस्त वाढविण्यात आला.
बेल्जियममध्ये हिंसाचार
बेल्जियमममध्ये कोरोना तसेच ओमायक्रोनचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले गेले आहेत. त्या निर्बंधांना तीव्र विरोध करत नागरिक रस्त्यावर उतरले. प्रचंड गर्दी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. फटाकेही फोडले. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डाव्या लागल्या.
ओमायक्रोनमुळे जगातील अनेक देशांमध्ये हाहाःकार माजला आहे. सरकारने घातलेल्या निर्बंधांना विरोध करत बेल्जियममध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून दगडफेक केली. इतकेच नव्हे तर फटाके फोडून आपला निषेध व्यक्त केला. ऑस्ट्रेलियामध्ये तर लसीकरणाच्या सक्तीविरोधात नागरिकांमध्ये दुफळी माजली. सक्तीला विरोध करणाऱया आणि लसीकरणाचे समर्थन करणाऱया नागरिकांनी समोरासमोर येऊन आंदोलन केले.
नाताळ जवळ आला असतानाच ओमायक्रोनचे संकट आले. त्यामुळे युरोपबरोबर पाश्चिमात्य देशांमधील नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. 31 डिसेंबरला ब्राझीलमध्ये नाताळ तसेच नववर्षाच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम असतो. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे तो रद्द करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेडही मिळत नसल्याचे चित्र ब्राझीलमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. इटलीमध्येही तशीच परिस्थिती आहे. तिथे रोज 15 हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत.
ब्रिटनमध्ये ओमायक्रोन रुग्णांची संख्या वाढत आहे. परदेशातून येणाऱया नागरिकांच्या विलगीकरणासाठी तिथे हॉटेल्स उपलब्ध होत नाहीत अशी अवस्था झाली आहे. लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली गेली आहे. स्पेनमध्ये कोरोनाचे निर्बंध कडक केल्यामुळे नागरिक आंदोलन करत आहेत. फ्रान्समध्ये दर दिवशी 50 हजारांवर कोरोना रुग्ण सापडू लागल्याने सरकारची झोप उडाली आहे. तेथील एक कोटी नागरिकांना सावधगिरी म्हणून बूस्टर डोसही देण्यात आला आहे.































































