दुचाकी – व्हॅन अपघातात शिक्षक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मुलाला कॉलेजमध्ये सोडून घरी परतणाऱ्या शेषराव भीमराव वाकुडे या शिक्षकांच्या दुचाकीला मारुती व्हॅनने जोरदार धडक दिली. या अपघातात वाकुडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी असणारे व मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक शेषराव भीमराव वाकुडे सकाळी दुचाकीने टोपीवाला ज्युनियर कॉलेजमध्ये मुलाला सोडून कुंभारमाठ येथे घरी परतत होते. यावेळी कसालवरुन मालवणकडे येणाऱ्या गोवा येथील ओमनी व्हॅनने (जीए ०३ आर ५६१९) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वाकुडे हे मोटारसायकलवरुन दूर फेकले गेले. तर दुचाकीचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातातील जखमी वाकुडे यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात वाकुडे यांच्या दोन्ही पायांना जबर मार बसल्याने अधिक उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातग्रस्त मारुती व्हॅन ही गोव्याहून मालवणला मासळी आणण्यासाठी आली होती अशी चर्चा होती. याबाबत पोलीस हे. कॉ. सुनील पवार, पो. कॉ. चंद्रशेखर मुणगेकर अधिक तपास करीत आहेत.