टँकर-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; एक ठार, सात प्रवासी जखमी

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धुंदलवाडी ब्रिजजवळ खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सात किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री हा अपघात झाला. रियाज (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृताचे नाव असून जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल्स बस आणि विरुद्ध दिशेने गुजरातकडून मुंबईकडे जाणारा केमिकलचा टँकर यांची मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील धुंदलवाडी फाटा ब्रिजजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामुळे गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी होऊन तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करीत रात्री उशिरा वाहतूक सुरळीत केली.