‘मातोश्री’वर बांधले नवान्न तोरण, रायगडच्या शिवसैनिकांनी जपली परंपरा

रायगडच्या शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर जाऊन आज नवान्न तोरण बांधले. निमित्त होते नवान्न पौर्णिमेचे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या तोरणाचा प्रेमपूर्वक स्वीकार केला. रायगडच्या शिवसैनिकांनी तीसहून अधिक वर्षे ही परंपरा जपत कृषी संस्कृती, भक्ती आणि संस्काराचा अनोखा संगम साधला.

भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिह्यात पहिल्या लोंब्यांना नवभात असेदेखील म्हणतात. गणेशोत्सवानंतर भाताची कापणी हेते. हे भात बाजारात विकण्यापूर्वी त्याच्या तांदळाचा भात व खीर याचा नैवेद्य दाखवला जातो. या भाताची शेतकरी मनोभावे पूजा करतात. नवान्न तोरण हे वैभवाचे प्रतीक आहे. शिवसेननेचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवान्न तोरण ‘मातोश्री’वर लावण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड जिह्यातून आलेल्या शिवसैनिकांची मोठ्या आस्थेने चौकशी केली. तसेच पिकांच्या परिस्थितीचीही माहिती जाणून घेतली. यावेळी रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल विभागप्रमुख मारुती भगत, पेण उपतालुकाप्रमुख चेतन मोकल, उपकार खोत, राजू शेणवेकर, सुनील घरत, राजेश काठे, बाळू वर्तक, अल्पेश ठाकूर आदी उपस्थित होते.

बळीराजा सुखी होऊ दे…

रायगडातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर नवान्न तोरण बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच बळीराजा सुखी होऊ दे, आपल्या मातीत पुन्हा भरभराट नांदो आणि शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीचे दिवे पेटत राहू दे, अशा शुभेच्छादेखील दिल्या. यापुढेही नवान्न तोरणाची परंपरा कायम ठेवण्यात येईल, असा निर्धार शिवसैनिकांनी यावेळी केला.