धक्कादायक! नवी दिल्लीत एका वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी नवी दिल्ली आणखी एका बलात्कार प्रकरणाने हादरली आहे. अमन विहारमध्ये एका वर्षांच्या मुलीचे हात-पाय आणि गळ्याला कपड्याने बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुलीच्या शोध घेत तिचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले तेव्हा समोरील दृश्य बघून त्यांना धक्का बसला. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते आणि हात पाय बांधलेल्या अवस्थेत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून आरोपी धमेंद्र उर्फ गोलू (20) तिला घेऊन गेला. तो तिच्या काकांच्या ओळखीचा असल्याने घरच्यांना संशय आला नाही. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नसल्याने तिचा शोध घेण्यात आला. कुटुंबीय धमेंद्रच्या शोले भटुरेच्या गाडीवर गेले तेथे तो नव्हता. तसेच तो घरीही नव्हता. त्यामुळे त्याचा आणि मुलीचा शोध घेण्यात आला. अमन विहारमध्ये शोले भटुरे बनवण्यासाठी तो वापरत असलेल्या लहान जागेत तो सापडला. तिथे मुलीला बांधण्यात आले होते. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घडलेला प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल करून धमेंद्रला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीला नीट बसताही येत नसल्याने त्याने तिला बांधून तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या धमेंद्रवर औषधोपचार करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.