चोरीच्या 19 मोटार सायकलसह एका आरोपीस अटक, पाच गुन्हे उघडकीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निलंगा येथे एका अल्पवयीन मुलासह एका युवकास चोरीची मोटारसायकल विकण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल 19 मोटारसायकल त्यांच्या कडून जप्त करण्यात आल्या आहेत. पाच दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शहरातून त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

29 मे रोजी पोलीस स्टेशन निलंगा येथे दाखल असलेल्या चोरीला गेलेल्या मोटरसायकल व आरोपीचा शोध सुरू असताना तपास पथकाला गोपनिय माहीती मिळाली की, बसस्टॅन्ड निलंगा परीसरात एक संशयीत इसम व त्याचा एक साथीदार असे मिळून चोरीची मोटार सायकल विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात तपास पथक सदर ठिकाणी पोहोचले पोलीस आल्याचा संशय आल्याने संशयीत इसम पळण्याचा प्रयत्न करीत असताना तपास पथकातील पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडून पोलीस स्टेशनला हजर केले.

पोलीस निरीक्षक शेजाळ यांनी व तपास पथकाने त्या संशयीत इसमांकडे कसून चौकशी केली असता त्यातील एका संशयीत ईसमाने त्याचे नाव लक्ष्मण संजय सुर्यवंशी (21) असे सांगितले. चौकशी दरम्यान त्यांने पोलीस स्टेशन निलंगा, औराद शहाजानी, लातूर शहर येथून तसेच कर्नाटक राज्यातील बस्वकल्याण भालकी, बिदर येथून मोटार सायकली चोरी केल्याबाबत माहीती दिली. या माहीतीवरून पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथक तयार करून पुढील तपास कामी रवाना करण्यात आले. तपास पथकांनी चोरीच्या मोटार सायकली ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला हजर केल्या. तपासात पोलीस स्टेशन निलंगा येथील गुन्हे निष्पन्न झाले आहेत. सदर गुन्हयात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान एकूण 19 मोटार सायकली ज्यांची किंमत 7 लाख 50हजार रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन निलंगा येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास सुरू असून निलंगा पोलीस स्टेशनचे सफौ बानाटे व पोलीस नाईक सुधीर शिंदे हे करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे, गोविंद राठोड, सपोउपनि बानाटे, पोलीस अमलदार विजयकुमार बिरादार, सुधीर शिंदे, निकमसिंग चव्हाण, शरद माने, बाळासाहेब नागमोडे, नितीन मजगे, बालाजी सोमवंशी, बळीराम मस्के, दिपक थोटे, संतोष कलबोने, बाबासाहेब जगताप तसेच चालक सफौ म्हेञे, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश मुळे, नामदेव सगर, गोविंद बेंबडे यांनी केली आहे.