
दिवंगत अभिनेते विनय आपटे यांच्या जन्मदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे एकांकिकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, 17 जून रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे हा महोत्सव होणार असून पुरस्कारप्राप्त एकांकिका पाहण्याची संधी यानिमित्ताने मुंबईकरांना मिळणार आहे.
विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या एकांकिका महोत्सवात 2024 च्या आयएनटी एकांकिका स्पर्धेत प्रथम परितोषिक विजेती सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि डिझाईन प्रस्तुत ‘पोर्ट्रेट’ ही एकांकिका पाहायला मिळणार आहे. याशिवाय यंदाच्या सवाई एकांकिका स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती क्राऊड नाट्यसंस्था आणि स्टोरीया प्रॉडक्शन निर्मित ‘चिनाब से रावी तक’ ही एकांकिकादेखील पाहायला मिळणार आहे. या एकांकिकेचे लेखक प्राजक्त देशमुख असून दिग्दर्शक संकेत पाटील आणि संदेश रणदिवे यांनी केले आहे. या दोन्ही एकांकिका 17 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजल्यापासून पाहता येतील. या एकांकिकेसाठी विनामूल्य प्रवेश आहे.