दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार

राज्य सरकारने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे. या खेळात सहभागी होणाऱया गोविंदांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे आता दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने 75 हजार गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे, पण या वर्षी यामध्ये वाढ करून दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळावे या मागणीसाठी दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे.