
सामना प्रतिनिधी । मुंबई
दारूच्या नशेत रस्ता चुकल्यानंतर तेथून माघारी परतताना दोघांना बंदुकीचा धाक दाखवणार्या एकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे तीन साथीदार पसार झाले असून त्यांचा आणि गुह्यातील बंदुकीचा शोध पोलीस घेत आहेत.
सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आण्णावाडी झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीच्या मागच्या बाजूला कार्गोचे ट्रक उभे राहण्यासाठी पार्किंग आहे. शुक्रवारी रात्री चार तरुण दोन दुचाकीवरून त्या ठिकाणी गेले. चौघेही दारूच्या नशेर तर्रर्र होते. रस्ता भरकटले आणि चुकून ते त्या ठिकाणी गेले. ते माघारी फिरले आणि पुढे रस्ता नसल्याचे सांगितले का नाही म्हणून त्यातील एकाने त्या ठिकाणी असलेल्या एका इसमाला बंदुकीचा धाक दाखवला तर वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला बंदूक लावून धमकावले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त दहिया व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ शोधमोहीम राबवून बंदुकीचा धाक दाखवणार्या सुनील माडगुंडे (30) या तरुणाला पकडले. सुनील हा पालिकेत सफाई कर्मचारी आहे.























































