
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने पुण्यातून एकाला अटक केली. सीबीआयचे पथक त्याला घेऊन पश्चिम बंगालला रवाना झाले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. हिंसाचार प्रकरणात भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर एक जण पुण्यात वास्तव्यास आल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयचे पथक पुण्यात दाखल झाले. हिंसाचार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली.
सीबीआयच्या पथकाने न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली असून त्याला घेऊन सीबीआयचे पथक पश्चिम बंगालला रवाना झाले.पश्चिम बंगालमधील निवडणुकीत प्रचारासाठी पुण्यातून काही कार्यकर्ते गेले होते. हिंसाचार प्रकरणात 35 हून जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित तरुण पुण्यात वास्तव्यास आल्याची माहिती आहे. त्याला पुण्यात आश्रय देण्यात आल्याची शक्यता असून त्या दृष्टीने सीबीआयकडून तपास करण्यात येत आहे.






























































