
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण हे प्रमुख हत्यार वापरत असले तरी आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांनी कोरोनाला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चाचण्यांमुळे निदान करून रुग्णांवर जलद उपचार करणे शक्य झाल्यामुळे मुंबईत कोरोनाला नियंत्रणात आणणे शक्य झाले. महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कोरोना चाचण्या आतापर्यंत 99 लाख 93 हजार 863 वर पोहोचल्या असून मुंबई उद्या, 21 सप्टेंबरला चाचण्यांमध्ये कोटय़धीश होणार आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून यात सुरुवातीपासून चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने 3 फेब्रुवारी 2020 पासून आरटीपीसीआर चाचण्या सुरू केल्या तर त्याहीपेक्षा वेगवान अशा अँटीजेन चाचण्या जुलै 2020 पासून अत्यंत संवेदनशील ठिकाणी, जलद निदानासाठी वापरल्या जात आहेत. आतापर्यंत यात 57 लाख 99 हजार 993 हून जास्त आरटीपीसीआर आणि 41 लाख 93 हजार 870 हून जास्त अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
सध्या कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकेत नाहीत
निर्बंधांनंतरही गणेशोत्सवात काही ठिकाणी गर्दी वाढली असली तरी सध्या कोरोनाच्या तिसऱया लाटेचे कोणतेही संकेत नाहीत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱया गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, असे असले तरी पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यात दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचे देखील राजेश टोपे म्हणाले.
चाचण्यांची महत्त्वाची भूमिका
कोरोना चाचणी केल्याशिवाय निदान होत नाही आणि निदान झाल्याशिवाय उपचार होत नाहीत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी चाचणी हा पहिला टप्पा आहे. त्या पार्श्वभूमीवर, एअर फोर्ट, रेल्वे स्थानके, गर्दीच्या ठिकाणी तसेच महापालिकेच्या आरोग्य सुविधा आणि कोरोना केंद्रांवर चाचण्या सुरू आहेत. महापालिकेच्या 260 हून जास्त जागांवर मोफत चाचण्या सुरू आहेत.
कोरोनामुक्त होण्याचा प्रमाण कायम
मुंबईत गेल्या काही दिवसांत दररोज रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे 400च्या पुढे गेले असले तरी कोरोनामुक्त होणाऱयांचे प्रमाण मात्र कायम आहे. मुंबईत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर कायम आहे. त्याचबरोबर दररोजच्या मृत्यूचे प्रमाणही गेले काही आठवडे 5 वर स्थिर आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला असला तरी तो 1 हजार 222 दिवसांवर आहे.






























































