
शिवसेनेचा अंतरंग, बाह्यरंग भगवाच आहे. शिवसेनेला हिंदुत्वाबद्दल विचारणारे काय करत आहेत? आम्ही भाजपपासून वेगळे झालोय, हिंदुत्वापासून नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. राममंदिर निर्माणाचे कार्य ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आमच्या ट्रस्टच्या वतीने एक कोटी रुपये देण्यात येत असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे हे शनिवारी प्रथमच अयोध्येत आले. ढोलताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अयोध्येत येण्याची ही तिसरी वेळ. हे माझे सौभाग्यच आहे. गेल्या वेळी आलो होतो तेव्हा राममंदिर बनेगा, नहीं बनेगा असे प्रश्न होते. त्यावेळेस शिवसेनेने मागणी केली होती. कायदा करून राममंदिर बांधा. कायदा तर काही झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आता राममंदिराचे काम मार्गी लागले आहे. 2018 मध्ये छत्रपती शिवप्रभूंच्या जन्मस्थळाची माती येथे आणली होती. त्यानंतर 2019 मध्ये न्यायालयाचा निकाल लागला. लोकसभेतही चांगले यश मिळाले. याच वर्षी मी मुख्यमंत्री झालो. प्रभू रामचंद्रांचीच ही कृपा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गार्ड ऑफ ऑनर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी विशेष विमानाने लखनौ विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अयोध्येच्या दिशेने रवाना झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हॉटेल पंचशील येथे आगमन होताच त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून सलामी देण्यात आली.
पुनः पुन्हा येणार, येतच राहणार!
अयोध्येचा परिसर हा संजीवनी देणारा आहे. येथे आले की नवे चैतन्य मिळते. रामलल्लांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज सगळय़ा भगव्या परिवाराला घेऊन आलोय. अयोध्येशी, इथल्या मातीशी शिवसेनेचे भावनिक नाते आहे. त्यामुळे रामलल्ला जेव्हा जेव्हा बोलावतील तेव्हा तेव्हा मी येणार, येतच राहणार, असे उद्धव ठाकरे यांनी बजावून सांगितले.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
अयोध्येत आलो की मला ते जुने दिवस आठवतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. गावागावांतून लोक आले होते. त्यांनी शिला आणल्या होत्या. आजही त्या शिला असतील येथेच. अयोध्येत भव्यदिव्य मंदिर झालेच पाहिजे, किंबहुना ते वैश्विक शिल्प ठरावे! आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मंदिर निर्माणासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या ट्रस्टच्या वतीने एक कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
आरतीसाठी पुन्हा येणार
शरयूची आरती करण्याची मनस्वी इच्छा होती, परंतु जगाच्या कानाकोपऱयात ‘कोरोना’ची दहशत पसरली आहे. कालच मी महाराष्ट्रातील जनतेला गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आज शरयू आरतीचा कार्यक्रम स्थगित करावा लागला. पण मी शरयूच्या आरतीसाठी पुन्हा येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजप म्हणजे हिंदुत्व नाही!
शिवसेनेला हिंदुत्ववादी आहोत असे दाखवण्यासाठी वारंवार अयोध्येत जावे लागते अशी वाचाळ बडबड भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली. त्याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला अर्धचंद्र दिला आहे असा टोला लगावतानाच त्यांनी शिवसेनेला कशाला हिंदुत्व शिकवता. आम्ही भाजपपासून वेगळे झालोय, हिंदुत्वापासून नाही, असे ठणकावून सांगितले.























































